भाजप बंडखोर ज्ञानेश्वर वाकडे अपघातात गंभीर जखमी; तर्कवितर्क सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षातून बंडखोरी केलेले ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कारला शनिवारी पहाटे मोहोळजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात वाकडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय वाकडे यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाकडे हे औशाचे विद्यमान आमदारांविरोधात यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यासाठी मुंबईला गेले होते. ही तक्रार दाखल करून ते आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा गावाकडे परतत होते. पहाटेच्या सुमारास मोहोळजवळील हायवेवर असताना, त्यांच्या वाहनाला पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने जोराची धडक दिली. ​ही धडक इतकी भीषण होती की वाकडे यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात गाडीतील इतर तीन ते चार जण जखमी झाले असून, ज्ञानेश्वर वाकडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

​अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाकडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ​ज्ञानेश्वर वाकडे यांनी नुकतीच सत्ताधारी आमदारांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. अशातच मुंबईहून परतत असताना हा अपघात घडल्याने, हा केवळ अपघात नसून तो एक ‘प्लॅन केलेला घातपात’ असू शकतो, अशी चर्चा होत आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.