म्हाडाची रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने 37 लाखांची फसवणूक, भामटय़ाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाची गिरणी कामगाराची रूम मिळवून देतो, अशी बतावणी करत एका मराठी व्यक्तीची 37 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱया भामटय़ाला काळाचौकी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. रुपेश सावंत असे त्याचे नाव असून तो एका बडय़ा नेत्याचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे समजते.

रुपेश सावंत (41) असे त्या भामटय़ाचे नाव आहे. दीपक पेडणेकर यांना स्वतःचे घर घ्यायचे असल्याने ते घर शोधत होते. तेव्हा त्यांच्या ओळखीच्या कानडे नावाच्या व्यक्तीने त्यांची रुपेश सावंत याच्याशी ओळख करून दिली. तेव्हा म्हाडाची गिरणी कामगाराची एक रूम असून ती 39 लाखात मिळवून देतो, असे सावंतने सांगितले. मग ठरल्याप्रमाणे पेडणेकर यांनी टप्प्याटप्प्याने सावंतकडे 40 लाख 40 हजार रुपये दिले. मात्र ज्यांच्या नावे रूम होती त्या श्रीपाद गुडाळकर यांना सावंतने एक रुपया देखील दिला नाही. तसेच त्यांची रूम सावंतने दुसऱयाच कोणाला विकल्याचे समोर आले. त्यामुळे पेडणेकर यांनी त्यांचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली असता रुपेश सावंतने त्यांना धमकावले. आपली सावंतने फसवणुक केल्याने पेडणेकर यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काळाचौकी पोलिसांनी रुपेश सावंत याला अटक केली. रुपेश हा कोकणातील एका नेत्याचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे समजते.