
शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना, कलावंत अशा सर्वांना एकाच वेळी भेटण्यास नकार देत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी पहिल्या टप्प्यात ठराविक पर्यावरणप्रेमींशी चर्चा केली. साधूग्राममध्ये आखाडय़ांसाठी कुटीया नाही, तर तीन जर्मन शेडच उभारावे लागणार असल्याने वृक्षतोडीशिवाय पर्याय नाही, अशी हटवादी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
आपण सर्वांचेच समाधान करू शकत नाही. कुंभमेळा काळात पावसाळा असताना कुटीया उभारणे योग्य ठरणार नाही, आम्ही जुनी झाडे कापणार नाही, पण मागील कुंभमेळ्याप्रमाणे तीनही आखाडय़ांसाठी तीन जर्मन शेड करावेच लागतील. त्यासाठी काही झाडे कापावीच लागतील, त्याशिवाय कुंभमेळा कसा होणार, असा प्रतीप्रश्न आयुक्तांनी केला. माईसचे टेंडर रद्द केले तरी दुसरे काढावेच लागेल. पंधराशे झाडे तोडण्याचा अहवाल बांधकाम विभागाने सर्वेनंतर दिला असला तरी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीनंतर किती झाडे तोडावी लागतील याचा निश्चित आकडा सांगता येईल, असेही त्यांनी सांगितले.
आंदोलन सुरूच राहणार
आयुक्तांनी यापुढे बैठक घेताना आधी होमवर्क करावा, कागदपत्रे आणि डेटा सादर करावा, अशी प्रतिक्रिया गोदाप्रेमी सेवा समितीचे संस्थापक देवांग जानी यांनी उपस्थित पर्यावरणप्रेमींच्या वतीने दिली. साधूग्रामच्या व्यवस्थेसाठी टेंडरच काढलेले नाही, जे सुरू आहे ते माईस हबसाठी, ही फसवेगिरी आहे, असा आरोपही त्यांनी केला. कोणती आणि किती झाडे तोडणार हे आयुक्तांनाच माहिती नाही. त्यामुळे आधी सर्वेक्षण करा ही आमची सूचना त्यांनी मान्य केली आहे, असेही त्यांनी सांगितले.






























































