अहिल्यानगरमधील 10 हजार निराधार संपर्क कक्षेच्या बाहेर!

निराधारांच्या योजनांचे पैसे थेट बँक खात्यावर जमा केले जातात. अनेकांचे केवायसी अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत. जिह्यात एक लाख 49 हजार 267 लाभार्थी आहेत. सध्या नऊ हजार 704 लाभार्थ्यांचे आधार ‘केवायसी’ पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत. यातील बहुतांशी लाभार्थी जिह्यात राहत असल्याने त्यांचा संपर्कही होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

निराधारांना संजय गांधी योजनेतून दरमहा 600 रुपये, तर इंदिरा गांधी योजनेतून 900 रुपये असे एकूण 1 हजार 500 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. याच पैशांवर संबंधित निराधार यांचा औषधपाण्याचा आणि उदरनिर्वाहाचा खर्च अवलंबून असतो. शासनाने अनुदान वाटपातील पारदर्शकतेसाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले.

मात्र, बहुतांश लाभार्थी हे वयोवृद्ध, अल्पशिक्षित किंवा तंत्रज्ञानापासून दूर आहेत. आधार कार्ड, मोबाईल क्रमांक लिंक नसणे किंवा बायोमेट्रिक जुळत नसणे अशा अनेक तांत्रिक कारणांमुळे त्यांची डीबीटी पोर्टलवर माहिती अद्ययावत होऊ शकलेली नाही. परिणामी, त्यांचे हक्काचे अनुदान थांबले आहे. जिह्यात 9 हजार 704 लाभार्थ्यांची केवायसी अपूर्ण असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. यामुळे संबंधितांच्या खात्यावर निराधार योजनेतील पैसे जात नसल्याचे सांगण्यात आले.

तालुका, लाभार्थी कंसात ‘केवायसी’ प्रलंबित
पारनेरः 22 हजार 742 (1 हजार 610), पाथर्डीः 9 हजार 547 (922), नगर शहरः 4 हजार 914 (101), कर्जतः 13 हजार 597 (626), अकोलेः 5 हजार 688 (178), जामखेडः 4 हजार 718 (39), कोपरगावः 10 हजार 713 (142), नगरः 9 हजार 899 (552), नेवासेः 4 हजार 989 (729), राहाताः 11 हजार 662 (1 हजार 84), राहुरीः 6 हजार 480 (2), संगमनेरः 11 हजार 586 (1 हजार 189), शेवगावः 18 हजार 917 (1 हजार 569), श्रीगोंदेः 7 हजार 860 (960), श्रीरामपूरः 5 हजार 955 (01).