अमेरिका, कॅनडा, डेन्मार्कमध्ये मायबोलीचा डंका, मराठीच्या परीक्षेत 103 एनआरआय विद्यार्थ्यांची बाजी

माय मराठीसाठी महाराष्ट्रात मराठी माणूस एकवटला असताना आता विदेशातूनही आनंदाची बातमी आली आहे. अमेरिका, कॅनडा, डेन्मार्कमध्येही माय मराठीचा डंका वाजला आहे. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या मराठी भाषेच्या परीक्षेत विदेशातील 103 विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने हा उपक्रम राबवला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ही कल्पना पुढे आली होती. नवी मुंबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात यासंदर्भात सामंजस्य करार झाला होता. विदेशात राहणाऱया मराठी कुटुंबांतील मुलांना मातृभाषेची गोडी लागावी हा उद्देश या उपक्रमामागे आहे.

उपक्रमाअंतर्गत पहिली ते आठवीच्या मुलांची मराठीची परीक्षा घेतली गेली. परीक्षेसाठी अमेरिका, कॅनडा व डेन्मार्कमधील 60 शाळांतील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यात अमेरिकेतील 67, कॅनडातील 22 आणि डेन्मार्कमधील 14 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यात 53 मुले व 50 मुली होत्या. राज्य सरकारचे प्रकाशन असलेल्या बालभारतीने या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवली. प्रत्येक वर्गासाठी वेगळय़ा प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या. 18 मे रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल बुधवारी लागला. त्यात सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले.

ही फक्त सुरुवात आहे!

‘अशा प्रकारची परीक्षा पहिल्यांदाच झाली आहे. पण ही सुरुवात आहे. यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न असेल व वर्षागणिक परीक्षेला बसणाऱया मुलांची संख्या वाढत जाईल’, असा विश्वास महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केला.