रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या 12 हिंदुस्थानींचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने काय दिली माहिती?

russia-ukraine-war1
फोटो प्रातिनिधीक

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्य दलात सेवा देणाऱ्या 12 हिंदुस्थानींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. मंत्रालयाने सांगितले की, सुमारे 18 हिंदुस्थानी नागरिक अजूनही रशियन सैन्यात सेवा देत आहेत. त्यापैकी 16 जण बेपत्ता आहेत.

याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांची 126 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या 126 प्रकरणांपैकी 96 लोक हिंदुस्थानात परतले आहेत आणि त्यांना रशियन सशस्त्र दलातून सुट्टी देण्यात अली आहे.”

ते म्हणाले की, ”18 हिंदुस्थानी नागरिक अजूनही रशियन सैन्यात आहेत आणि त्यापैकी 16 बेपत्ता आहेत.” जैस्वाल म्हणाले, “रशियन बाजूने त्यांना बेपत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आलं आहे. आम्ही वाचलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना तात्काळ सैन्यातून सुट्टी देऊन मायदेशी परत पाठवण्याची मागणी करत आहोत.”

या आठवड्याच्या सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्यात तैनात असलेल्या केरळ येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या नातेवाईकाला गंभीर दुखापत झाली. मृतकाचे नाव बिनिल टीबी असल्याचं सांगण्यात येत आहे. बिनिलच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना जयस्वाल म्हणाले, “बिनीलचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. आमचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, जेणेकरून त्यांचे पार्थिव लवकरात लवकर हिंदुस्थानात परत आणता येईल. जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीवर मॉस्कोमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार पूर्ण करून तो लवकरच देशात परतेल, अशी अपेक्षा आहे.”