छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेत मोठी कारवाई, 12 नक्षलवाद्यांचा खात्मा

प्रातिनिधिक फोटो

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळाले आहे. डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड) सुकमा यांच्या पथकाने झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. ही चकमक किस्टाराम पोलिस ठाण्याच्या हद्दीत पामलूर जंगल परिसरात झाली. मृत नक्षलवाद्यांमध्ये कोंटा एरिया कमिटीचा सचिव सचिन मंगडू याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सुकमा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण हे संपूर्ण कारवाईवर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. घटनास्थळावरून AK-47, INSASसह ऑटोमॅटिक शस्त्रे जप्त करण्यात आली असून इतर नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

डीआरजीने शुक्रवार उशिरा संध्याकाळी पलोदी आणि पोटाकपल्ली परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. हे दोन्ही भाग किस्टाराम पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. हा संपूर्ण ऑपरेशन 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद निर्मूलन मोहिमेचा एक भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी बीजापूर जिल्ह्यात झालेल्या वेगळ्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले होते. बीजापूर डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्डच्या पथकाने शनिवारी सकाळी जिल्ह्याच्या दक्षिणेकडील जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू केले असता नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आणि प्रत्युत्तरात कारवाई करण्यात आली.

प्रत्युत्तरात्मक कारवाईत दोन नक्षलवादी ठार झाले. छत्तिसगडमध्ये 2025 मध्ये एकूण 285 नक्षलवाद्यांचा मृत्यू सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकींमध्ये झाला. यापैकी 257 नक्षलवादी बस्तर विभागात मारले गेले, ज्यामध्ये बीजापूरसह 7 जिल्ह्यांचा समावेश आहे, तर 27 नक्षलवादी रायपूर विभागातील गरियाबंद जिल्ह्यात ठार झाले. यापूर्वी 20 डिसेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त केली होती.

छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, CRPF च्या 159 व्या बटालियनचे जवान आणि सुकमा डीआरजीचे पथक उर्संगल कॅम्पमधून नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना झाले असताना गोंडपल्ली गावाजवळ डोंगराळ भागातील नक्षल ठिकाणाबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्यात बोल्ट-अॅक्शन रायफल, तीन मझल-लोडिंग बंदुका, 12 बोरची रायफल, 7.62 मिमी SLR चे 150 जिवंत काडतुसे, 5.56 मिमी INSAS रायफलची 150 काडतुसे आणि .303 रायफलच्या 100 काडतुसांचा समावेश आहे.