
राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील सुविधांच्या भीषण तुटवड्याबाबत विधानपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यातील हजारो शाळांमध्ये साधी मैदाने आणि शौचालयांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सभागृहात मांडली.
सभागृहात बोलताना सुनील शिंदे म्हणाले की, सध्या राज्यातील १२ हजार ५६० शाळांकडे स्वतःची हक्काची मैदाने नाहीत. इतकेच नव्हे तर, अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सोयीसुविधांचा मोठा अभाव आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) प्रत्येक शाळेत या सुविधा असणे अनिवार्य आहे. मात्र वास्तवात या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. यावर भाष्य करताना त्यांनी सवाल केला की, आरटीईनुसार शाळांना या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन एखादा निश्चित कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार आहे का?
यावेळी त्यांनी मुलींच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला. राज्यातील ८८६ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये उपलब्ध नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. ही शौचालये बांधण्यास तांत्रिक कारणांमुळे विलंब लागण्याची शक्यता असल्याने, तोपर्यंत या शाळांमध्ये तात्पुरती फिरती शौचालये (Mobile Toilets) उपलब्ध करून देणार का, असा पर्यायही त्यांनी सरकारसमोर ठेवला.























































