ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ तेलवाहू जहाज बुडालं; 13 हिंदुस्थानींसह 16 जण बेपत्ता

प्रातिनिधिक फोटो

ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ एक तेलवाहू जहाज बुडाल्याचे वृत्त आहे. या जहाजावर 13 हिंदुस्थानींसह 16 कर्मचारी होते. सोमवारी (15 जुलै) रोजी ही घटना घडली असून तेव्हापासून हे सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती ओमानच्या सागरी सुरक्षा दलाने दिली आहे.

ओमानच्या सागरी सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रेस्टीज फाल्कन नावाचे तेलवाहू जहाज दुबईच्या हमरिया बंदराहून निघाले होते. या जहाजावर कोमोरोसचा झेंडा होता. येमेनच्या अदन बंदराकडे येत असताना सोमवारी या जहाजाचा ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ अपघात झाला. डुकम या ओमानमधील बंदराजवळ असलेल्या रास मद्राकाच्या शहरापासून अग्नेय दिशेला 46 किलोमीटर दूर अंतरावर हे जहाज समुद्रात बुडाले. तेव्हापासून या जहाजावरील कर्मचारी बेपत्ता असून गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातानंतर प्रेस्टीज फाल्कन हे तेलवाहू जहाज समुद्रात उलटे झाले. यासोबत कर्मचारीही समुद्रात बुडाले. अपघातानंतर जहाजातून तेलगळती झाली अथवा नाही किंवा हे जहाज पुन्हा सरळ करण्यात आले अथवा नाही याची माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, अपघात झालेले जहाज 2007मध्ये बांधलेले असून 117 मीटर लांबीचे असल्याची माहिती मिळतेय. कमी अंतरावर प्रवास करण्यासाठी या जहाजाचा वापर केला जात होता. या जहाजाचा ज्या डुकम बंदराजवळ अपघात झाला ते ओमानच्या नैऋत्य दिशेला आहे. ओमानच्या तेल आणि वायू खाण प्रकल्पांचे ते प्रमुख केंद्र असून या ठिकाणी तेलशुद्धीकरणाचे मोठे प्रकल्पही आहेत.

तर दुसरीकडे अदम हे येमेनमधील प्रमुख शहर असून 2014 पासून येथे इराण समर्थित हूती विद्रोह्यांसोबत गृहयुद्ध सुरू आहे. इस्रायल-हमासमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर हूती विद्रोह्यांकडून अदनच्या खाडीजवळ जहाजांवर हल्लेही झाले होते. याविरोधात अमेरिका आणि ब्रिटनने मोर्चा सांभाळत येमेनमधील हूती विद्रोह्यांच्या 4 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे.