एकाच प्रभागात ‘अतिक्रमण’ केलेल्या पालिकेच्या 134 कामगारांना ‘हटवले

राजकीय वरदहस्ताखाली एकाच प्रभागात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अतिक्रमण हटाव पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. फेरीवाले व भूमाफियांसोबत असलेल्या साटेलोट्याबाबत आलेल्या तक्रारींची पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दखल घेत या जम्बो बदल्या केल्या आहेत. मॅडम कमिशनरच्या या दणक्याने अन्य विभागातदेखील ठाण मांडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आर्थिक लाभ आणि राजकीय प्रभावामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनेक कामगार एका प्रभागातच अनेक वर्षे काम करत होते. त्यामुळे त्यांचे फेरीवाले आणि भूमाफियांसोबत चांगलेचे साटेलोटे जमले होते. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने फेरीवाले हटव मोहिमेचा अक्षरशः फज्जा उडाला होता. तसेच बेकायदा बांधकामांवरही प्रभावी कारवाई होत नव्हती. मात्र महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या कामगारांच्या बदल्या केल्या आहेत.

प्रशासनाचे कठोर पाऊल 

कामगारांच्या बदल्या करून प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी अशाच प्रकारच्या बदल्या केल्या होत्या. परंतु राजकीय दबाव आणि वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे कामगारांनी आपल्या स्थानिक प्रभागांमध्येच राहण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे यावेळी महापालिका आयुक्त डॉ. जाखड आणि अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी हा प्रकार टाळण्यासाठी विशेष काळजी घेत दणका दिला. महापालिका आयुक्तांच्या या निर्णयामुळे फेरीवाले आणि बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे.