
राज्यात गोमांस विक्रीला बंदी असतानाही संगमनेर शहरात गोवंश हत्येचा आणि गोमांस विक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. आज सलग दुसऱया दिवशी पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकत 1370 किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अलिम जलिल कुरेशी (वय 34), जमीर जाफर पठाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील मोगलपुरा परिसरात दोन ठिकाणी एकाच दिवशी धडक कारवाई करून तब्बल 2 लाख 74 हजार रुपये किमतीचे 1370 किलो गोमांस आणि धारदार शस्त्रसामग्री जप्त केली आहे. या प्रकरणात दोनजणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत मोगलपुरा भागात पोलिसांनी छापा टाकून 724 किलो गोमांस जप्त करत अलिम जलिल कुरेशी (वय 34) याला अटक केली. या संदर्भात कॉन्स्टेबल सुरेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय मुंढे करीत आहेत.
दुसऱ्या छाप्यात मोगलपुरा भागात जमीर जाफर पठाण (रा. मोगलपुरा) याच्याकडून 650 किलो मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल पांडे यांनी फिर्याद दिली असून, तपासाची जबाबदारी पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल गवळी यांच्याकडे आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असली, तरी नागरिक पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करीत आहेत.
 
             
		



































 
     
    






















