
गुजरातमधील सुरत येथे बनावट वैद्यकीय पदवी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. ही मंडळी मागील 32 वर्षांपासून 70 हजार रुपयांत बनावट पदवी देत आहे. गुजरात पोलिसांनी 14 बनावट डॉक्टरांना अटक केली आहे. आठवी पास व्यक्तीदेखील रुग्णांची तपासणी करत असल्याचे आढळून आले. संबंधित टोळी अल्पशिक्षित बेरोजगारांना पैसे घेऊन बनावट पदवी द्यायची. एक आरोपी शमीम अंसारी आठवी पास असून त्याने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे अलीकडेच एक चिमुकली दगावली.
पोलिसांनी मुख्य आरोपी रमेश गुजराथी आणि बीके रावत यांच्याकडून शेकडो कागदपत्रे जप्त केली. त्यांनी आतापर्यंत 1200 जणांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते. नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी 5 हजार रुपये शुल्क आकारले जाते. या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. बनावट पदवी प्रमाणपत्राचे वाटप होत असल्याचे समजताच पोलिसांनी तीन इस्पितळांवर छापा टाकला. तेव्हा बॅचलर ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसिन आणि सर्जरीचे प्रमाणपत्र हाती लागले, या प्रमाणपत्रांना गुजरात सरकारची मान्यता नसल्याचे समजताच हा प्रकार उघडकीस आला.
आरोपी गुजराथीने आपण 1990 च्या दशकात बीएचएमएसमध्ये शिक्षण घेतल्याची कबुली दिली. त्याने अनेक ट्रस्टमध्ये वक्ता म्हणून काम पाहिल्याचे तो सांगतो. अपेक्षित फायदा होत नसल्याने त्याने इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. गुजराथीने एका टोळीच्या सहकार्याने 2002 मध्ये गोपीपुरा भागात महाविद्यालय सुरू केले. मात्र विद्यार्थ्यांअभावी महाविद्यालय बंद झाल्यानंतर त्याने दुसरा आरोपी बीके रावतला हाताशी धरून बनावट पदवी देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याने अभ्यासक्रमाची पदवी देण्यासाठी पाच जणांना कामावर ठेवून मंडळ स्थापन करण्याची योजना आखली. तीनऐवजी दोन वर्षांत पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना इलेक्ट्रो होमिओपॅथी औषधे लिहिण्याचे प्रशिक्षण दिले गेले. मग 70 हजार रुपये भरताच त्यांना 15 दिवसांत प्रमाणपत्र देण्यात आले.