
संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य लॉटरीची विश्वासार्हता अजूनही कायम आहे, पण महाराष्ट्र राज्य लॉटरी दुसऱया राज्यात विक्रीला बंदी आहे. दुसरीकडे परराज्यातल्या लॉटरीचा पंधरा हजार कोटी रुपयांचा महाराष्ट्राचा लॉटरी टॅक्स थकला आहे, पण तरीही परराज्यातील लॉटरीला महाराष्ट्र मोकळे रान दिले आहे. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच राज्य लॉटरी रसातळाला चालल्याचा आरोप होत आहे.
हिंदुस्थानातील लॉटरीला तीनशे वर्षांचा इतिहास आहे. पोर्तुगीजांच्या काळात गोव्यात लॉटरी सुरू झाली. त्यानंतर हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर सर्वप्रथम लॉटरी सुरू करणारे केरळ राज्य होते. त्यानंतर देशाच्या अनेक भागांत लॉटरी सुरू झाली. 1969 मध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झाली. अंध, अपंग, विधवा, सेवानिवृत्त व असंख्य बेरोजगारांना महाराष्ट्र राज्य लॉटरीमुळे रोजगार निर्माण झाला. त्यानंतर लॉटरी बंद करण्याच्या वावडय़ा सुरू झाल्या. आता पुन्हा लॉटरी व्यवसाय वाढवण्यासाठी समिती नेमली आहे, पण लॉटरी व्यवसाय डबघाईला येण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
700 ते 800 कोटींचा महसूल मिळेल
राज्याच्या लॉटरीतून सरकारला सध्या सुमारे 25 कोटी रुपये मिळतात. पण आमच्या सूचनांनुसार सहकारी तत्त्वावर विक्री केल्यास राज्याला आम्ही दरवर्षी 700 ते 800 कोटी रुपयांचा महसूल मिळवून देऊ, असा दावा महाराष्ट्र राज्य लॉटरी विव्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी केला.
राज्याची फसवणूक
2007 पासून परराज्यातील लॉटरी विक्रीतून महाराष्ट्र राज्याला तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा लॉटरी टॅक्स येणे बाकी आहे. टॅक्स भरण्यास विलंब करून परराज्यातील लॉटरीतून राज्य सरकारची अशा प्रकारे फसवणूक होते. ही वसुली सर्वप्रथम करावी, अशी मागणी आहे.
तीन कोटींचा तोटा
महाराष्ट्र राज्य लॉटरी ही 2023-2024 या वर्षात सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक तोटय़ात आहे, अनेक शासकीय योजना तोटय़ात आहेत म्हणून त्या बंद करता येत नाहीत. शेवटी महाराष्ट्रातील लॉटरी विव्रेत्यांचा उदरनिर्वाह सांभाळणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे लॉटरी विव्रेत्यांचे म्हणणे आहे
– महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकीट राज्यात विकली जात नसली तरी अन्य राज्यातील लॉटरी विकत घेताना दिसतात. ईशान्येच्या राज्यातील किंवा पंजाबच्या लॉटरीची पाचशे रुपयांची तिकिटेही विकली जात आहेत. ते आपल्याहून मोठय़ा रकमेची बक्षीस देतात. त्याचं कारण म्हणजे त्या लॉटरी खाजगी ऑपरेटर चालवतात.
– दिवाळी बंपरच्या दोन लाख महाराष्ट्र राज्य लॉटरी छापल्या होत्या, पण त्यातील सुमारे एक लाख वीस हजारांच्या आसपासच लॉटरी विकल्या गेल्या. गुढीपाडव्याला दोन लाख लॉटरीच्या तिकीट छापल्या, पण एक लाख 22 ते 30 हजारांच्या आसपास लॉटरी विकल्या गेल्या. आता 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त फक्त साठ हजार लॉटरीची तिकिटे छापली आहेत. दुसऱया राज्यातील न विकल्या गेलेल्या लॉटरी परत घेतल्या जातात, पण महाराष्ट्र राज्य लॉटरी विकली न गेल्यास परत घेतली जात नाही.