ठाण्याच्या बेडेकर शाळेतील 16 विद्यार्थी लखनौमध्ये अडकले; ट्रेन चुकली, बस कंपनीने फसवले, धर्मशाळेत आश्रय

स्काऊट गाईडच्या शिबिरासाठी ठाण्याच्या बेडेकर शाळेतील १६ विद्यार्थी लखनौमध्ये गेले होते. मात्र परतीच्या प्रवासादरम्यान त्यांची ट्रेन चुकली. त्यानंतर खासगी बस कंपनीनेदेखील त्यांना फसवले. त्यामुळे त्यांना धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला. विद्यार्थी लखनौमध्ये अडकल्याचे समजताच मुलांच्या पालकांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. दरम्यान, विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत असलेले दोन शिक्षक सुखरूप असल्याचे समजताच पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बेडेकर विद्या मंदिरातील सातवी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या १६ विद्यार्थ्यांचा कॅम्प लखनौमध्ये गेला होता. शुक्रवारी पुन्हा ठाण्याकडे परतण्यासाठी त्यांची ट्रेन होती. मात्र स्टेशनला उशिरा पोहोचल्याने गाडी निघून गेली. त्यामुळे त्यांना शुक्रवारची रात्र स्टेशन परिसरातच काढावी लागली. दरम्यान, सोबत असणाऱ्या शिक्षकांनी एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून एक बस आरक्षित केली. बसमालकाने ३५ हजार रुपये घेतले. मात्र बसमध्ये बिघाड झाल्याचे सांगून मालकाने पोबारा केला.

… अन् एका रात्रीत सूत्रे हलली
मुलांच्या पालकांपैकी एकाने ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना रात्री एक वाजता फोन करून सांगितली. प्रधान यांनीही तत्काळ आमदार जितेंद्र आव्हाड यांना घडलेला प्रकार सांगितला. आव्हाड यांनी एका रात्रीत सर्व सूत्रे हलवली. सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था केली. तसेच लखनौमधील स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उद्या सोमवारी विमानाने मंबईत आणण्यात येणार आहे.