सरन्यायाधीशांनी पकडली एआय टूल वापरून बनवलेली याचिका; याचिकाकर्ता 12 वी उत्तीर्ण, तांत्रिक शब्दांमुळे न्यायालयात अडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

याचिका लिहिताना वकिलांकडून एआयचा वापर वाढल्याबाबत काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आज एका याचिकाकर्त्याने एआयचा वापर केल्याचे सरन्यायाधीशांनी पकडले. त्याला खडे बोल सुनावत आपल्या गावी जाऊन स्वेटर विक्री करण्याचा सल्ला दिला.

लुधियानातील रजनीश सिद्धू नावाच्या कापड व्यावसायिकाने पीएम केअर्स फंडच्या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यातील शब्दप्रयोगांवरून सरन्यायाधीशांना संशय आला. याचिकेमागील खरा चेहरा दुसराच असू शकतो, असे म्हणत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याची परीक्षा घेतली. न्या. कांत यांनी सर्वप्रथम याचिकाकर्त्याचे शिक्षण किती झाले, हे विचारले. त्यावर आपण 12 वी उत्तीर्ण असून होजिअरीचा व्यवसाय असल्याचे तसेच 5.25 लाख रुपये आयकर भरल्याचे त्याने सांगितले. सरन्याधीशांनी त्याची परीक्षा घेतली. त्यात 30 टक्के गुण मिळाले तरी मी मान्य करेन की याचिका तुम्ही लिहिली आहे, असे म्हणत एका शब्दाचा अर्थ विचारला. याचिकाकर्त्याला तो सांगता आला नाही.

अंतिम इशारा दिल्यानंतर केले मान्य

सरन्यायाधीशांनी अंतिम इशारा दिल्यानंतर सिद्धू याने याचिका एआय टूलचा वापर करून बनवल्याचे मान्य केले. 3-4 एआय टूल वापरून मी स्वतः याचिका लिहिली आहे. वकिलांना देण्यासाठी पैसे नव्हते. टायपिस्टला 4 जॅकेट भेट दिल्यानंतर त्याने लिहून दिल्याचे सिद्धू म्हणाला. त्याला सरन्यायाधीशांनी पुन्हा अशा याचिका दाखल न करण्याचा इशारा देत याचिका फेटाळली.