
अन्नातून 20 विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची घटना गुरुवारी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील वृद्धेश्वर वारकरी संस्थेत घडली. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित असून काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे. तर काहींवर अजूनही उपचार सुरू आहेत.
वृद्धेश्वर वारकरी संस्थेत एकूण 32 विद्यार्थी राहत असून बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून विद्यार्थी झोपले. मात्र, पहाटे 20 विद्यार्थ्यांना जुलाब व उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने तिसगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यातील काही विद्यार्थ्यांना उपचार करून सोडून देण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत.