
दारुच्या पाच बाटल्या सलग प्यायल्यानंतर एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने आपल्याच मित्रासोबत 10 हजार रुपयांची पैज लावली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकात कार्तिक हा 21 वर्षाचा तरुण राहत होता. दीड वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि आठच दिवसांपूर्वी त्याला मुलगा झाला होता.
कार्तिक आपल्या मित्रांसोबत बसला होता. कार्तिकने आधी दावा केला की मी पाच बाटल्या दारू सलग पिऊ शकतो. मित्रांनी त्याचा हा दावा खोटा असल्याचे सांगितले. त्यानंतर कार्तिकने आपल्याच मित्रांसोबत 10 हजार रुपयांची पैज लावली. कार्तिकने दारूच्या पाच बाटल्या सलग रिचवल्या. त्यानंतर कार्तिकची तब्येत बिघडली. कार्तिकला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. तसेच इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोधे घेत आहेत.