
जालना येथील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या लोखंडी सळ्याचे उत्पादन करणार्या गजकेसरी स्टील कारखान्यामध्ये शनिवारी भीषण स्फोट झाला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लोखंड वितळण्याच्या भट्टीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात 22 जण जखमी झाले असून चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जालना येथील ओम मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले.
कारखान्यात झालेल्या या स्फोटामुळे प्रचंड आवाज झाला आणि आजूबाजूला धुळीमुळे अंधारही पसरला होता. या संदर्भात कारखाना व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्फोटात कोणाचाही मृत्यू झाला नाही. चंदनझिरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.