
म्हाडाने गेल्या वर्षी काढलेल्या मुंबईतील घरांच्या सोडतीमधील दिंडोशीतील शिवधाम कॉम्प्लेक्स आणि खडकपाडा येथील शिवनेरी गृहनिर्माण सोसायटी या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या योजनेमधील 222 विजेते वर्षभरापासून घराचा ताबा कधी मिळणार या प्रतीक्षेत आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या वर्षी ऑगस्टला 2030 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात 1327 निर्माणाधीन घरांचादेखील समावेश करण्यात आला होता. यातील गोरेगाव प्रेमनगर आणि कोपरी पवई येथील विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, परंतु दिंडोशीतील शिवधाम कॉम्प्लेक्स आणि शिवनेरी गृहनिर्माण संस्था येथील इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे विजेत्यांचे घराचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.
शिवधाम कॉम्प्लेक्समध्ये अल्प उत्पन्न गटाच्या 88 तर शिवनेरी गृहनिर्माण संस्था येथे अल्प उत्पन्न गटाच्या 133 आणि मध्यम उत्पन्न गटाच्या एका घरांचा समावेश आहे. एप्रिलपर्यंत इमारतीचे काम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याचे म्हाडाचे नियोजन होते, पण नोव्हेंबर उजाडला तरी प्रमाणपत्र मिळालेले नाही. सोडतीत यशस्वी झालेल्या विजेत्यांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच विजेत्यांना देकारपत्र जारी करण्यात येईल, असे म्हाडाचे म्हणणे आहे.




























































