भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळलं; एकाला वाचवण्यात यश, दोन पायलटसह तिघे बेपत्ता

प्रातिनिधिक फोटो

भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले आहे. गुजरातच्या पोरबंदर येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर अरबी समुद्रात बुडाले. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून दोन पायलटसह चौघे प्रवास करत होते. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले असून दोन पायलटसह तिघे बेपत्ता आहेत. तटरक्षक दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे.

अरबी समुद्रात अडकलेल्या एका जहाजाने भारतीय तटरक्षक दलाकडे मदतीसाठी संदेश पाठवला होता. जहाजामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर अरबी समुद्रात दाखल झाले होते. लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर जहाजाजवळ पोहोचले तेव्हा ही दुर्घटना घडली. सध्या दोन पायलट आणि अन्ये एकाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. तटरक्षक दलाने चार जहाज आणि दोन एअरक्राफ्ट शोधमोहिमेवर पाठवले आहेत.

या अपघाताबाबत भारतीय तटरक्षक दलाने एक निवेदन जारी केले आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या एडव्हॉन्स लाईट हेलिकॉप्टरने गुजरातमध्ये नुकत्याच आलेल्या पुरात 67 लोकांचा जीव वाचवला होता. सोमवारी रात्री 11 च्या सुमारास हिंदुस्थानचा झेंडा असणार्‍या एका जहाजावरील गंभीर जखमी क्रू मेंबरला वैद्यकीय मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना करण्या आले होते. पोरबंदरपासून हे जहान 45 किलोमीटर दूर अरबी समुद्रात होते. जहाजाने संदेश पाठवून मदतीची विनंती केली होती, असे तटरक्षक दलाने सांगितले.

मदतीसाठी पाठवलेल्या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. ऑपरेशनवेळी हेलिकॉप्टरला समुद्रामध्ये लँडिंग करावी लागली. यात असणाऱ्या एका क्रू मेंबरला वाचवण्यात आले असून तिघांचा शोध सुरू आहे. हेलिकॉप्टरचे अवशेष अरबी समुद्रात सापडले असून सध्या बेपत्ता पायलटसह तिघांचा शोध सुरू असल्याचे तटरक्षक दलाने स्पष्ट केले.

दरम्यान, गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहा:कार उडवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नौदलानेही कंबर कसली. भारतीय तटरक्षक दलाने पोरबंर आणि द्वारकामध्ये रेस्क्यू ऑपरेशनही राबवले. येथे हेलिकॉप्टरद्वारे 33 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत वेगवान वारा आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता तटरक्षक दलाने गुजरातमध्ये 60हून अधिक लोकांचा जीव वाचवला.