
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालानुसार 2025 मध्ये एकाच वर्षात देशात 166 वाघांचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील 41 वाघांचा समावेश असल्याची कबुली सरकारकडूनच आज विधान परिषदेत देण्यात आली. वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी अतिसंवेदनशील भागात नियमित गस्त सुरू करण्यात आली असून डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून शिकारी हालचालींवर नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सत्यजित तांबे यांनी वाघांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर वनमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. पेंच प्रकल्पात डिसेंबर 25 मध्ये एक आणि जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या वाघांचे दोन मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाघांच्या संरक्षणासाठी ‘एम-स्ट्रीपेस’ प्रणाली असलेल्या मोबाईलचा पुरवठा कर्मचाऱयांना करण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवत असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.
वाघांच्या सुरक्षेसाठी…
अवैध शिकाऱयांची माहिती मिळवण्यासाठी परिक्षेत्र स्तरावर खबऱयांची नेमणूक.
अतिसंवेदनशील भागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालय, नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्षाची निर्मिती.
अतिसंवेदनशील भागात वाहनांसाठी तपासणी नाक्यांवर वाहनांची नियमित तपासणी.
वाघ व बिबट मागोव्याचा पंधरवडी कार्यक्रम राबवून त्यांच्या अस्तित्वाची तपासणी.
वाघाचे भ्रमण मार्ग, पाणवठे या ठिकाणी पॅमेरे लावून वन्यजीवांचे नियमित ट्रपिंग.
हिंस्र प्राण्यांचे मानवांवरील हल्ले कमी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स.


























































