क्रीडानगरीतून – मुंबईसह उपनगर, रत्नागिरी बाद फेरीत

श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या 61 व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात रायगड, अहिल्यानगर, रत्नागिरी, परभणी व बीड संघांनी आपली आगेकूच सुरू ठेवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच मुंबई, मुंबई उपनगर या संघांनीही बाद फेरीत धडक मारली. त्याचप्रमाणे मुंबईने परभणीवर 29-22 असा 1 डाव राखून 7 गुणांनी पराभव करत दिमाखात बाद फेरी गाठली. मुंबई उपनगरने नंदुरबारवर एक डाव राखून 49-16 असा सहज पराभव केला. बलाढय़ सांगलीकडून जळगाव 48- 16 असा 1 डाव 32 गुणांनी पराभूत झाला. रायगडने छत्रपती संभाजीनगरवर 28-12 अशी बाजी मारली.

मुंबई उपनगर मुंबईमध्ये कडवी लढत

महिलांच्या गटात मुंबई उपनगर आणि मुंबई यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. उपनगरने  30-26 असा 4 गुणांनी थरारक विजय मिळवला. उपनगरच्या साक्षी वाफेलकर, साक्षी पारसेकर, सिद्धी हिंदळेकर तर पराभूत मुंबईच्या खुशबू सुतार, सेजल यादव, इशाली आंब्रे यांनी रंगतदार खेळ करत शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

अन्य सामन्यात रत्नागिरीने नंदुरबारचा 50- 6 असा 1 डाव राखून 44 गुणांनी धुव्वा उडवला. रत्नागिरीकडून साक्षी लिंगायत, तेजल पवार, वैष्णवी फुटक तर पराभूत नंदुरबारकडून नेहा वसावे यांनी जोरदार खेळ करत वाहवा मिळवली.

माचो वन डे कप मुंबई क्रिकेट क्लबने जिंकला

सातत्यपूर्ण सांघिक कामगिरी करणाऱया मुंबई क्रिकेट क्लबने माचो वन डे कप क्रिकेट स्पर्धा जिंकली. रंगतदार अंतिम फेरीत टीम वर्क क्रिकेट क्लबवर 22 धावांनी विजय मिळवला.

ओव्हल मैदानावर झालेल्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबई क्रिकेट क्लबने 40 षटकांत 9 बाद 267 धावा केल्या. त्यात आठव्या क्रमांकावरील अयान पठाणने 51 चेंडूंमध्ये 82 धावांची नाबाद खेळी करताना त्यात मोलाचा वाटा उचलला. अयानने त्याच्या झटपट खेळीमध्ये 11 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी केली. अंकुश पासवान (35) आणि शौर्य वीर नागरने (33) छोटेखानी खेळी करून त्याला चांगली साथ दिली. प्रतिस्पर्धी संघाकडून ऑफस्पिनर वीरा सिंगमणी (4 विकेट) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

प्रत्युत्तरादाखल टीम वर्क क्रिकेट क्लबला 40 षटकांत 7 बाद 245 धावांची मारता आली. वीरा सिंगमणीसह (71) साद खान (41), वरुण दोशी (35) आणि आग्नेय आदीने (28 धावा) चांगला प्रतिकार केला तरी मुंबई क्रिकेट क्लबचा अवैस खानसह (3 विकेट) अन्य गोलंदाजांनी अचूक मारा करताना टीम वर्क क्रिकेट क्लबला विजयापासून रोखले.

अव्वल मानांकित अन्विशाचा सहज विजय

बॉम्बे जिमखाना येथे सुरू असलेल्या गौतम ठक्कर स्मृती ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलींच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित अन्विशा घोरपडेने मिताली महामुनीवर 15-8, 15-6 असा सहज विजय मिळवला.

याच गटातील राऊंड ऑफ 32 फेरीतील अन्य सामने चुरशीचे झाले. स्पृहा जोशीला अनिका तनेजाने 15-12, 12-15, 16-14 असे झुंजविले. पहिला गेम गमावूनही पूर्वी शिर्पेने राधा रावराणेचा 13-15, 15-13, 15-9 असा पराभव केला.

निकाल 15 वर्षांखालील मुले (दुहेरी राऊंड ऑफ 32 फेरी) ः कनक जोशी/वरद कोल्हापुरे विजयी वि. अरहम भंडारी/मॅकडोनाल्ड कोलाको (2) 15-9, 15-9; असद मुलाणी/            सर्वेश्वर बेदाडे (3) विजयी वि. अमन आनंद/जश मेहता 15-12, 11-15, 15-11, रोनित जाधव/युवराज सिंग विजयी वि. अभिमन्यू शेटे/विवान वायंगणकर 15-9, 13-15, 15-11; धनुष शाह/ऋषिकेश जयसिम्हा विजयी वि. परम रसाल/राजविभव घोरपडे 11-15, 15-11,15-8; लियाम पैस/राइस पैस विजयी वि. क्रितिक एम/साहित हरी 11-15, 15-8, 15-9 .