राज्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 64 जणांचा मृत्यू; मानव-वन्य प्राण्यांमध्ये वाढता संघर्ष

जंगलांमधील मानवी अतिक्रमणामुळे वन्य प्राणी आणि मानवातील संघर्ष तीव्र होत चालला असून एका वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 64 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाकडून पुढे आली आहे, तर एक लाखाहून अधिक ठिकाणी वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

आमदार संजय जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात कोकण व विदर्भासह अनेक जिह्यांत रानटी हत्ती, बिबटय़ा, गवे, रानडुक्कर व अन्य प्राण्यांनी मोठय़ा प्रमाणावर शेतीचे नुकसान केले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 410 हून अधिक शेतकऱयांचा मृत्यू झाला तसेच राजापूर परिसरात बिबटय़ाने दहशत पसरवलेली आहे. सध्या गवारेडय़ांचा त्रास वाढला असून शेतकऱयांचे काजू व इतर फळझाडांचे नुकसान त्यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील दोडामार्ग व सावंतवाडीतही जंगली हत्तींचा वावर असून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाल्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

यावर वन विभागाने दिलेल्या लेखी उत्तरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 2023-24 मध्ये 64 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये वन्य हत्तींचा वावर व उपद्रवामुळे शेती पीक व फळझाडांचे नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. वन्य हत्तींनी केलेल्या हल्ल्यांमध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाईमध्ये वाढ करून देण्यासाठी भेकुर्ली, करे, बांबर्डे, पाळ्ये, सोनावल, हेवाळे, घाटीवाडे, घोडगेवाडी येथील ग्रामस्थांनी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षकांच्या कार्यालयासमोर जनआंदोलन केले होते.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्यानंतर नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्याची मागणी पुढे आली वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला 25 लाख रुपयांची आता नुकसान भरपाई देण्यात येत आहे. वनाधिकारी, कर्मचारी व स्थानिकांच्या मदतीने हत्ती हाकारा गट तयार करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत वन्य हत्तींना मानवी वस्तीपासून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्यात येते. वन्य हत्ती मानवी वस्तीमध्ये येऊ नये म्हणून वनक्षेत्रामध्ये जिथे शक्य आहे तिथे हत्ती प्रतिबंधक चर म्हणजेच खंदक खोदण्यात येते. दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे, घोडकेवाडी व पेंद्रे बुद्रुक या ठिकाणी हत्ती पॅम्प उभारण्यात आले आहेत. हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी नाईट मोड ड्रोन पॅमेऱयाचा वापर करण्यात येतो.