
गेल्याच आठवड्यात अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा दणक्यात पार पडली होती. आता राज्य कुस्तीगीर परिषदेनेही येत्या 26 ते 30 मार्चला कर्जत-जामखेड येथे आपल्या 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक आणि आमदार रोहित पवार यांनी दिली.
सध्या राज्यात कुस्ती संघटकांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे दोन संघटना सक्रिय असून दोघेही एकमेकांना धोबीपछाड देण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या कुस्ती संघटनेने राजकीय बळाचा दुरुपयोग करून अनधिकृत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेतील सहभागी मल्लांवर अन्याय केला. ही स्पर्धा कुस्तीपेक्षा कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायानेच अधिक गाजली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या खऱ्या संघटनेच्या माध्यमातून खरी आणि राजकारण विरहित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आम्ही यशस्वी आयोजन करून दाखवू असा निर्धार स्पर्धा संयोजक रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रोहितदादा पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेड आणि अहिल्यानगर तालीम संघातर्फे 66 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याचे कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
कुस्तीपटूंची मजा
अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीत विजेत्यांवर पुरस्काराच्या रूपाने कोट्यवधी रकमांच्या बक्षिसांची उधळण करण्यात आली होती. विजेत्यांना 20 लाख रुपयांपेक्षा महाग असलेल्या थार देण्यात आल्या होत्या. आता दुसऱ्या केसरीतही अशीच चारचाकी वाहने आणि रोख रकमेच्या बक्षिसांची उधळण केली जाणार आहे. नव्या संघटनेने परिषदेच्या संघटनेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा इशारा दिल्यामुळे नेमके कोणते खेळाडू हा स्पर्धेत उतरण्याचे धाडस दाखवतात हे पाहणे थरारक असेल.