
जगात अनेक प्रकारच्या हिंसक क्रांती झाल्या; पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्याच क्रांती शांततेच्या मार्गाने केल्या. त्यांनी प्रत्येक वेळी हिंसा टाळण्यात यश मिळवले. सर्वांना, विशेषतः महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी संघर्ष करूनही केवळ मानवतेचे धडे दिले, असे प्रतिपादन राज्य कर तपासणी सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.
अंधेरी पश्चिम येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विजय जाधव होते, तर सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी संस्थेचा परिचय करून दिला. दरम्यान, प्रज्ञा, शील, करुणा या मूल्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उद्योजकता वाढवून समाजाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही देशभ्रतार यांनी केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त नीना हरिनामे, सदाशिव गांगुर्डे, सुनील वाघ, संजय जाधव, राजेश शेटये, फिल्म डिव्हिजनचे संचालक मिलिंद उके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अक्षय आंबेडकर, डॉ. सीमा पवार, ऍड. राजेश खोब्रागडे, डॉ. महादेव कांबळे, प्रवीण बोदले, बापूजी रामटेके, आर. आर. खरात, अर्चना बच्छाव उपस्थित होत्या.