Jehanabad stampede – सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, श्रावणी सोमवारी घडली दुर्दैवी घटना

बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यामध्ये श्रावणी सोमवारनिमित्त सिद्धेश्वरनाथ मंदिरात गर्दी उसळली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिलांचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच जेहानाबादचे जिल्हा न्याय दंडाधिकारी अलंकृत पांडे आणि पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यन, या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण जखमीही झाले असून त्यांना उपचारांसाठी मखदुमपूर आणि जेहानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरच चेंगराचेंगरी झाली. यावेळी रेलिंग तुटली आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. आम्ही मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांची चौकशी करत असून मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती जेनानाबादचे एसएचओ दिवाकर कुमार विश्वकर्मा यांनी दिली.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी सांगितले की, मुखदुमपूर येथील बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. आम्ही परिस्थितीवर नजर ठेऊन असून सध्या येतील परिस्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मोठी दुर्घटना घडली होती. 2 जुलै रोजी बाबा नारायण हरी यांच्या कार्यक्रमावेळी हजारो भक्तांची गर्दी उसळली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 120 लोकांचा मृत्यू झाला होता.