
महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे पालिकेतील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. १ हजार ७७३ पदांच्या जागांसाठी तब्बल ७५ हजार अर्ज आले असून या भरती प्रक्रियेला पुढच्या महिन्यापासून पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या असून परीक्षेसाठी केंद्रांचा शोध सुरू करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेतील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील १ हजार ७७३ पदांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पदे ही आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागासाठी असून यामध्ये इतर पदांचादेखील समावेश आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली होती. त्यानंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्याने या भरती प्रक्रियेला ब्रेक लागला. याशिवाय या भरती प्रक्रियेच्या विरोधात काही जणांनी न्यायाल यातदेखील धाव घेतल्याची चर्चा सुरू होती. अखेर सहा महिन्यांनंतर या भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात होणार असून पुढच्या महिन्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
– भरती परीक्षेसाठी जिल्हानिहाय केंद्र असणार आहेत. अर्जदारांची परीक्षा ही त्या त्या जिल्ह्यात होणार असून यासाठी केंद्राचा शोध घेण्यात येणार आहे.
– ज्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे त्या ठिकाणी ठाणे पालिकेच्या निरीक्षकाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
– भरती प्रक्रियेसाठी तब्बल ७५ हजार इच्छुकांनी विविध पदासाठी अर्ज केले आहेत. यासाठी प्रत्येक अर्जदारांकडून १ हजार ८०० रुपयांचे शुल्कदेखील घेण्यात आले आहे.



























































