
पुण्यातील एका जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेला तब्बल 76 वर्षांचा कायदेशीर लढा अखेर निकाली लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जमिनीच्या वादाप्रकरणी दाखल केलेल्या दाव्यावर अंतिम पडदा टाकत, मूळ जमीनमालकाच्या वारसांमध्ये जमिनीची समान विभागणी करण्याचे आदेश दिले आहेत. दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद मार्गी लागल्याने अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
मूळ जमीनमालक एम एम एच जनमोहम्मद यांच्या मालकीच्या पुण्यात एक एकरच्या दोन मोठय़ा मालमत्ता होत्या. त्यापैकी एक जमीन डेक्कन कॉलेज रोड परिसरात, तर दुसरी येरवडा भागात होती. या मालमत्तांवरील हक्काबाबत वारसांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर हा वाद 1950 साली न्यायालयात पोहोचला आणि अनेक दशकांपर्यंत विविध न्यायालयांत तो प्रलंबित राहिला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या एकलपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने दीर्घकाळ चाललेल्या या वादावर अखेर पडदा टाकत, उरलेल्या जमिनीचे वारसांमध्ये विभाजन करून प्रत्येकाला त्यांचा कायदेशीर हिस्सा देण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे सात दशकांहून अधिक काळ रखडलेल्या मालमत्ता वादाचा निकाल लागला.
न्यायालयाचे निरीक्षण
z न्याय मिळण्यास उशीर झाला असला तरी, पिढय़ान्पिढय़ा चाललेला हा वाद निकालात निघाल्यामुळे वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमिनीचा ताबा आता अधिकृतपणे वारसांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
z जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून तिची योग्य भागात विभागणी जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाने करावी.
































































