
शहापूर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांची बारदाने कुणी कुरतडली याचा शोध घेण्यासाठी 80 लाखांच्या बारदान घोटाळ्याची आता पुन्हा चौकशी होणार आहे. आठ महिन्यांपूर्वी नेमण्यात आलेल्या लेखापालांच्या चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चौकशीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसत असून दोषींना पाठीशी घालण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्याने या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दोषारोप झालेल्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
2019-20 व 2020-21 मध्ये महामंडळाकडे बारदान उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांकडून बारदानासह भात खरेदी करण्यात आला होता. सदर बारदान शेतकऱ्यांना परत करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत भिवंडी येथील पुरवठादाराला नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार शहापूर व मुरबाड तालुक्यातील दुधनोली, अघई, मढ-अंबर्जे व खर्डी येथील केंद्रांतर्गत येणाऱ्या गोदामात सुमारे वे एक कोटी दहा लाख किमतीचे तीन लाख 38 हजार 447 नग उतरवण्यात आले होते. या बारदान प्रक्रियेत अपहार झाल्याच्या तक्रारी – आल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या लेखापालांच्या चौकशीमध्ये 80 लाख 85 हजारांचे दोन लाख 47 हजार 937 बारदानाचे नग गायब झाल्याचे निष्पन्न झाले होते.