ठाणे महापालिकेच्या तिजोरीत 15 दिवसांत 9 कोटी जमा, पाणी बिल वसुली जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणी बिल थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या १५ दिवसांत प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ९ कोटी ९९ लाख १४ हजारांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईत पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांच्या पाण्याच्या नळाचे कनेक्शन कापणे, नोटिसा देणे, पंप जप्त करणे आणि पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे.

दिवा येथे ३१३ नळसंयोजन खंडित करण्यात आली. २१ पंप जप्त, तर ३४ पंप रूम थेट सील करण्यात आले आहेत. तसेच ३२४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभाग समिती हद्दीत ७० कनेक्शन कापण्यात आले. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती १३४, मुंब्रा प्रभाग समितीत २३६, नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत २४५, उथळसर प्रभाग समिती हद्दीत ७१, वर्तकनगर येथे ४, वागळे प्रभागमध्ये १ अशा एकूण १ हजार ७४ नळाचे कनेक्शन खंडित करण्यात आले.

मालमत्ता कर थकबाकीदारांवर कडक कारवाई करा

ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. मागील एक ते दोन महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने नाराजी व्यक्त करत, जे कर भरत नाही अशा मालमत्ताधारकांवर कडक कारवाई करून मालमत्ता जप्त करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. तसेच अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून १० फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. करवसुली वाढविण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.