हिंदुस्थानचा चार दिवसांत शत्रूवर विजय, 93 वा हिंदुस्थानी हवाई दल दिन उत्साहात साजरा

कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने ताबडतोब घेतला. पाकिस्तानविरोधात हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवली. या मोहिमेत हिंदुस्थानने अवघ्या चार दिवसांत शत्रूवर विजय मिळवला, असे विधान हिंदुस्थानी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी बुधवारी केले. ते गाझियाबाद येथील हिंडन हवाई दल तळावर 93 व्या हवाई दल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेतील आमची कामगिरी योग्य आणि अचूक होती. हवाई दलाचे काळजीपूर्वक नियोजन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि दृढनिश्चय याद्वारे काय साध्य करता येते याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे एक ज्वलंत उदाहरण आहे. स्वदेशी शस्त्रांनी शत्रूच्या प्रदेशात जाऊन खोलवर अचूक हल्ले केले. त्यात आम्हाला यश आले, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हवाई दलाच्या विमानांनी नेत्रदीपक करमणूक सादर केली. या वर्षीच्या हवाई दल दिनाची थीम ‘सक्षम, बलवान, आत्मनिर्भर’ आहे. यावेळी हवाई दलाच्या धाडस आणि शौर्यासाठी 97 शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.