ए घायवळ, ए मारणे सांगितलं ते समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल करू नको!!

‘ए घायवळ, ए मारणे… सांगितलं ते समजलं का? कोणत्याही राजकीय नेत्याला भेटू नको, नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल करू नको, गुन्हेगारी स्वरूपाचे रिल्स बनवू नको, दहशत निर्माण होईल असे स्टेटस टाकाल तर बघाच…’ असा दम आज पोलिसांनी पुण्यातील गुंडांना भरला. पुणे शहरातील 32 टोळ्यांमधील 267 कुख्यात गुंडांची ओळख परेडच पोलीस आयुक्तालयात घेण्यात आली. मिंधे सरकार आणि गुंडांच्या महायुतीचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरून टीकेची झोड उठल्याने सरकारची तंतरली आणि करून आदेश गेल्यानेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून गुंडांची ओळख परेड घेतली गेली, असे बोलले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सराईत गुन्हेगार हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्या वेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी घायवळ टोळीचा म्होरक्या नीलेश घायवळ याने थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेतल्याचे समोर आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हे दोन्ही फोटो ट्वीट केल्याने एकच खळबळ उडाली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्तालयात पुण्यातील टॉपमोस्ट गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके, रायझिंग गँगस्टर यांची परेड घेण्यात आली. यात नीलेश घायकळ, गजानन मारणे, सचिन पोटे, बाबा बोडके, उमेश चव्हाण उपस्थित होते. याशिकाय आंदेकर, बंटी पकार, ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगारांचीही हजेरी घेण्यात आली. हे गुन्हेगार सध्या काय करतात, त्यांचे जामीनदार, मित्र यांची पोलिसांनी माहिती घेतली. तसेच यापुढे गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याबाबत दम भरला.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके, सराईत यांची परेड घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे आदींनी या गुन्हेगारांची परेड घेत त्यांना समज दिली.

गुन्हेगारी स्वरूपाचे रिल्स तयार करून ते प्रसारित करणाऱयांकर लक्ष ठेवण्यासाठी सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य खपकून घेतले जाणार नाही.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

गुन्हेगारी स्वरूपाचे रिल्स बनविणारे रडारवर
कुख्यात गुंडांकडून हातात कोयता, पिस्तूल घेऊन गुन्हेगारी स्वरूपाचे रिल्स बनविले जातात. हे व्हिडीओ स्टेटसला ठेवून एकप्रकारे गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे काम केले जाते. अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे व्हिडिओ, रिल्स बनकिल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिला.

‘रायझिंग गँगस्टर्स’समोरच नामचीन गुंडांना झापले
शहरातील नामचीन कुख्यात गुंडांची पोलिसांनी आज हजेरी घेत गुन्हेगारी थांबविण्याचा दम भरला. शेजारीच नव्याने गुन्हेगारीत पावले टाकणारे ‘रायझिंग गँगस्टर्स’ उभे होते. ज्यांच्याकडे पाहून ते गुन्हेगारीत आले, त्यांनाच पोलिसांनी झापल्याने ‘रायझिंग गँगस्टर्स’देखील हाताची घडी आणि खाली माना घालून थांबले होते.

गुंड नीलेश घायवळची मंत्रालयात रिलबाजी – विजय वडेट्टीवार
राज्यातील शिंदे सरकार गुंडांना अभय देत असून जामिनावर बाहेर असलेला गुंड नीलेश घायवळ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात राजरोसपणे भेटतो आणि तिथे रिल्सही बनवतो, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. गुंड घायवळ याने मंत्रालयात बनवलेली रिल्स वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि कुख्यात गुंड नीलेश घायवळ यांचा हा फोटो ट्विट केला आणि असाच रोज एक फोटो ट्विट करणार असा इशारा देताच मिंधे सरकारची पळापळ झाली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार कामाला लागले.

गोड से… ढिल से
मिंधे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा हुक्का पार्लरमधील एका महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हीच का या खासदारांची संस्कृती, अशी विचारणा तिवारी यांनी केली आहे. या व्हिडीओवर नेटकऱयांनी गोडसे यांना चांगलेच ट्रोल केले आहे. दरम्यान, खासदार गोडसे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असून यासंदर्भात सोमवारी रात्रीच शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याचे म्हटले आहे.