
<< चंद्रसेन टिळेकर
आपल्या समाजामध्ये यापूर्वी केव्हाही नव्हती एवढी मोठी प्रचंड बुवाबाजी बोकाळलेली दिसतेय. परिणामी या देशात हजारो वर्षे ठाण मांडून बसलेला ‘घातकी दैववाद’ आणखी भक्कम होतो. याच दैववादाने आमच्या देशात वैज्ञानिक जिज्ञासा रुजू दिली नाही, विवेकी वृत्ती फुलू दिली नाही, चिकित्सक पिंड घडू दिला नाही. परिणामी विज्ञानाचे स्फुल्लिंग इथे प्रज्वलित झालेच नाही.
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु,!
गुरु देवो महेश्वरा !
गुरु साक्षात परब्रह्म,!!
वरील श्लोकात म्हटल्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत गुरूला परब्रह्माचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे बहुतांशी भारतीयांचे जसे देव मानल्याशिवाय त्यांच्या व्यवहाराच्या वृक्षाचे पानही हलत नाही तद्वतच कोणाला ना कोणाला गुरू केल्याशिवाय भारतीय व्यक्तीचे किंवा त्याच्या कुटुंबाच्या कल्याणाचे घोडे गंगेत स्नान केल्याचे समाधान देत नाही. गुरूपणाच्या गुंगीत रमणे हे आपल्या समाजात केवळ व्यक्तिपुरते किंवा कुटुंबापुरते मर्यादित नाही तर संपूर्ण जातीचा, जमातीचा होलसेल गुरूही असतो. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या एका पुढारलेल्या जातीत ही प्रथा श्रद्धेने पाळली जाते.
भारतीयांचे कोणाला ना कोणाला गुरू करण्याचे वेड किंबहुना सोस याच समाजातील रिकामटेकडे, लबाड ढोंगी परावलंबी बांडगुळांच्या डोमकावळी नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. हा त्यांच्यासाठी बिनभांडवलाचा उत्तम धंदा होता. त्यासाठी लागणारे भांडवल म्हणजे पुराणातल्या काही भाकडकथा, थोडेसे पाठांतर अन् ठासून भरलेला बोलबच्चनपणा एवढेच काय ते! त्यासाठी कुठलेही फारसे उच्चशिक्षण न घेता चार इयत्ता पायउतार केल्या म्हणजे झाले.
आज आपल्या समाजामध्ये यापूर्वी केव्हाही नव्हती एवढी मोठी प्रचंड बुवाबाजी बोकाळलेली दिसतेय, विशेषतः गेल्या दहा वर्षांत! संबंध देशभर या बाबा, बुवा, बापू, स्वामी, महाराज माता यांचे रोज कुठे न कुठे प्रवचन, आख्यान चाललेले असते आणि त्यातून तद्दन अशास्त्रीय, अविवेकी अशा विचारांचा मारा समोरच्या भक्तगणांवर करणे हेही अव्याहतपणे चालले असते.
दुर्दैव म्हणजे लाखोंच्या संख्येने भाबडे भाविक भक्तगण आपली सारासार बुद्धी बाजूला ठेवून ते विचार कृतीने अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. परिणामी या देशात हजारो वर्षे ठाण मांडून बसलेला ‘घातकी दैववाद’ आणखी भक्कम होतो. याच दैववादाने आमच्या देशात वैज्ञानिक जिज्ञासा रुजू दिली नाही, विवेकी वृत्ती फुलू दिली नाही, चिकित्सक पिंड घडू दिला नाही. परिणामी मानवी विकासाचा पाया असलेल्या विज्ञानाचे स्फुल्लिंग इथे प्रज्वलित झालेच नाही. या सर्वाचे गुन्हेगार आहेत ते गुरूचा, सदगुरूंचा बुरखा घेतलेले हे बुवा, बापू, महाराज अन् त्याचबरोबर त्यांचा धोरणीपणाने उदोउदो करणारे स्वार्थी राजकारणी. अन्यथा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री तरुणांना आपले सण-उत्सव धूमधडाक्यात साजरा करा मी तुमच्या पाठीशी आहे अशी दर्पोक्ती कशी करू शकतो? समाजाचे धार्मिक संवर्धन करणे हे मुख्यमंत्र्याचे काम आहे काय? दुसरे एक मंत्री आपल्या मंत्रिपदाच्या शपथविधीला कोकणातल्या एका कथित जगदगुरूच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि वर राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता बलवत्तर असते अशी दर्पोक्ती करतात हे एक प्रकारे राजसत्तेने बुवाबाजीला दत्तक घेतल्यासारखे नाही काय?
धोकादायक बाब म्हणजे हे बाबा लोक जे विष पसरवितात ते केवळ त्यांच्या समोर बसलेल्या भक्तगणांपर्यंतच मर्यादित रहात नाही तर घरोघरी कार्यक्रम पाहणाऱ्या कोट्यावधी देशबांधवापर्यंत पोहोचतो. इथे काही मोजक्याच बाबांची मुक्ताफळे देतो म्हणजे किती उच्च कोटीचा बिनडोकपणा ते समाजात पसरवतात याची कल्पना येईल. हे बाबा-बुवा लोक अधिकतर उत्तर भारतातले शर्मा, वर्मा नावाची असतात. त्यातला एक वर्मा समोरच्या लाखो भक्तांना आश्वासित करतो की, ‘तुमच्या मुलाने वर्षभर अभ्यास केला नसेल तरी चालेल, फक्त तो जेव्हा परीक्षेला जाईल तेव्हा वाटेत लागणाऱया शिवमंदिरातल्या शिवलिंगावर बेलाचे पान वाहायला सांगा. तो अव्वल मार्काने उत्तीर्ण होईल. ये मेरी
गॅरंटी आहे!’ यापेक्षा आणखी मोठी दिशाभूल ती कोणती?
दुसरा सोमेश्वर का रामेश्वर बाबा म्हणतो, ‘स्त्रियांनी जमिनीवर लोटांगण घालून देवाला पुरुषांप्रमाणे नमस्कार करू नये कारण त्यामुळे त्यांच्या वक्षःस्थळांचा भार जमिनीवर पडतो. तो पृथ्वी मातेला सोसवत नाही!’ एक गुरूमाता तर, बाहेरख्याली पुरुषांच्या अर्धांगिनींना उपाय सांगते, ‘तुम्ही तुमच्या व स्वत:च्या पतीच्या अंतर्वस्त्राची एकत्र गाठ बांधून ती दोन्ही वस्त्रे देव्हऱ्या समीप ठेवा. तुमचे पती सुतासारखे सरळ होतील आणि तुमचा संसार सुखाचा होईल!’
हा लेख लिहित असतानाही मला माझ्या टिव्हीवरील बाबा-बुवांची मुक्ताफळे ऐकायला येत आहेत. आजच्या वर्तमान पत्रातील एक बातमी आहे ती म्हणजे रायगड जिह्यातील पोलादपूर येथे मंत्राने पाऊस पाडतो असे सांगून एका बाबाने अनेकांना एकूण 36 लाख रुपयांना गंडा घातला आहे. मला तर कधी कधी असे वाटते की या बाबा लोकांना शिक्षा करण्यापूर्वी अगोदर त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांना शिक्षा करावी. आपोआप या जगात काहीही निर्माण होत नाही हे समजायला काय फार उच्च कोटीची बुद्धिमत्ता लागते काय? बुवा महाराजांकडे जाणारी सगळी माणसे भाबडी असतात असेही नाही. तर ती बऱ्याचदा लोभी असतात. विशेषत गुप्तधन शोधून देतो किंवा पैशाचा पाऊस पाडतो अशी ग्वाही देणाऱ्या बाबांच्या मागे जाणारे.
व्यक्तीपूजा हा आपल्या समाजाचा अंगीभूत गुण, खरे म्हणजे दुर्गुण आहे. गुरू सांगेल त्यावर विश्वास ठेवणे आणि तो मागेल ते त्याला अर्पण करणे हे मग ओघानेच येते आणि त्याचा फायदा हे गुरू लोक घेतात. साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी यदुनाथ नावाचे एक सद्गुरू गुजराती समाजात होऊन गेले. त्यांना स्त्रीसंगाचा खूप नाद होता पण भक्त निष्ठेने याबाबत मौन पाळून होते. पण या गुरूंचे डॉक्टर होते प्रसिद्ध समाजसेवक डॉ. भाऊ दाजी लाड.! त्या गुरूंना गुप्तरोग झाल्याचे डॉ. लाड यांच्या लक्षात आले. काही दिवस त्यांनी ही गोष्ट वैद्यकीय संकेतानुसार गुप्त ठेवली पण गुरूंच्या विरुध्द नंतर जो खटला भरला गेला त्यामध्ये न्यायाधीशांपुढे ही बाब उघड करावीच लागली. महाराष्ट्रातली काही भाविक मंडळीही यात मागे नाहीत. आसाराम बापू भले तुरुंगात असतील पण महाराष्ट्रातल्या त्यांच्या भक्तांनी आषाढी-कार्तिकीला त्यांची दिंडी काढून ती पंढरीला नेण्याचे सत्कृत्य गेल्या वर्षापासून सुरू केले आहे. या सर्वामध्ये पुलं म्हणतात तसा आपला बौद्धिक आळस आहे, तर कविवर्य मंगेश पाडगावकर त्या बद्दल म्हणतात,
प्रत्येकासी येथे हवा, कुणीतरी जबरी बुवा
जो काढील साऱ्या उवा, मनातल्या चिंतांच्या
आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही
आपण भिडायचे नाही आयुष्याला!!
इति गुरु चारित्र्य समाप्त !!
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी
चळवळीशी निगडित आहेत.)