ग्वाल्हेरमधील BSF अकादमीतून 2 महिला कॉन्स्टेबल बेपत्ता, एजन्सींकडून शोध सुरू

मध्य प्रदेशामधील ग्वाल्हेर जिल्ह्यातील टेकनपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अकादमीतून दोन महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आकांक्षा निखार आणि शहाना खातून अशी बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची नावे असून 6 जून 2024 पासून त्या बेपत्ता आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीएसएफच्या तुकड्यांना सतर्क करण्यात आले आहे.

आकांक्षा निखार ही मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर, तर शहाना खातून ही बंगालमधील मुर्शिदाबादची रहिवासी आहे. दोघीही 2021 पासून बीएसएफ अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोघीही बेपत्ता झाल्या. तेव्हापासून एजन्सींकडून त्यांचा शोध सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी दोघींच्या मोबाईलवरुन संशयास्पद हालचाली ट्रेस केल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

फोन रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने दोघींचा शोध घेण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल, दिल्ली, हावडा आणि बेहरामपूर येथे त्यांच्या फोनचे लोकेशन पिंग केलेले रेकॉर्ड दर्शवतात. त्यानुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये दोघींनी प्रवास करण्यामागील कारण तपासण्यात येत आहे. बेहरामपूरमधील बीकन हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 7 जून रोजी दोघी शेवटच्या दिसल्या आहेत. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर दोघींचे फोन बंद झाले.

घरचे चिंतेत

दरम्यान, मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने घरचेही चिंतेत आहेत. मुलीसोबत 5 जून रोजी बोलणे झाले तेव्हा ती चिंतेत असल्याचे जाणवल्याचे आकांक्षाच्या आईने ग्वाल्हेर पोलिसांना सांगितले. यानंतर 6 जून रोजी आकांक्षाच्या आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार ग्वाल्हेर पोलीस ठाण्यात नोंदवली. आकांक्षाचा शोध घेण्यासाठी ग्वाल्हेर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. तसेच ग्वाल्हेर पोलिसांच्या समकक्षांसह राज्य आणि केंद्रीय एजन्सीशी संपर्क साधला आहे.