
आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची आहे. अनेकांना अनेक वर्ष संधी देऊनसुद्धा काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी सत्ता पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे स्वच्छ दिसतंय. त्यावर उत्तर शोधावं लागेल. ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
महायुतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता बघा पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 खासदार निवडून दिलेत. याचा अर्थ जनतेचा कल बदललेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत.
वळसे पाटलांवर निशाणा
दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा, मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. 35 वर्षे आमदार, त्यापैकी 25 वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल, असे पवार म्हणाले.
अतुल बेनके यांच्या भेटीवर प्रतिक्रिया
अतुल बेनके सध्या कोणत्या पक्षात आहेत मला माहिती नाही. पण, आम्हा दोघांत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या उमेदवाराचं काम केलं ते सगळे आमचेच आहेत असं माझं मत आहे. अतुल बेनके यांचे वडील वल्लभ शेठ बेनके माझे चांगले मित्र होते. अतुल हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यामुळे या भेटीत राजकारण आणू नका असे शरद पवार म्हणाले.
तीनही पक्ष मिळून लढणार
पुण्यात किती जागा मिळू शकतात, याबाबत आम्ही आताच काही बोलणार नाही. पण आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे. त्यासाठी तीनही पक्ष एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. त्यामुळे आम्हाला इतक्याच जागा द्या याच जागा द्या असे आम्ही करणार नाही. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आम्ही तीनही पक्ष मिळून लढणार आहोत. लोकांच्या समोर जाणार आहोत आणि या राज्यात स्थिर सरकार आणणार आहोत. हे आमचं मुख्य उद्धिष्ट आहे, असेही शरद पवार म्हणाले.