Jalna News – समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; वाहन चालक जागीच ठार

समृध्दी महामार्गावर समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज 22 ऑगस्ट गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही घटना जालन्यातील बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी जवळ घडली.

टाटा सुप्रो मिनी पिकअप चालक उमेश भीमराव बनसोड रा. शिवाजीनगर नाशिक हे नाशिक ते अमरावती जात असतांना समृध्दी महामार्ग नागपूर नजीक पांगरी शिवारात 22 ऑगस्ट गुरूवार रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास वाहनावरील ताबा सुटल्याने समोर चाललेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकून अपघात झाला आहे.

वाहन चालक उमेश भीमराव बनसोड जागीच ठार झाला असल्याची माहीती रुग्णवाहिकामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आर.के. निकम,पो.काँ.ठोंबरे,पो.काँ.परसुवाले, निखिल बोडखे,लहू जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली.

पोलीसांनी वाहन चालकास तात्काळ समृद्धी रुग्णवाहिकामध्ये टाकून सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साह्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये ड्रॅगन फूड,आलु, बुखरा ही फळे असून सदर अपघातग्रस्त वाहन समृद्धी हायड्राच्या साह्याने एडमिन बिल्डिंग येथे आणून उभे केले आहे. तसेच मृताच्या नातेवाईकांना फोन करून सांगितले आहे व सदर वाहनांमध्ये फळे असल्यामुळे फळ मालकाला फोन करून तात्काळ सदर माल घेऊन जाण्याचे सांगितले असून त्यांचे वाहन येत आहे. महामार्ग पोलीसांनी बदनापूर पोलीस ठाणे व कंट्रोल रूम जालना यांना अपघाताची माहिती दिली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.