पश्चिमरंग – सोनाटा म्युझिकल फॉर्म

>> दुष्यंत पाटील

क्लासिकल कालखंडात ‘सोनाटा’ हा नवीन म्युझिकल फॉर्म उदयास आला. या फॉर्ममध्ये संगीतकारांना आपल्या संगीतातल्या कल्पना मांडायला अधिकाधिक स्वातंत्र्य मिळायला लागलं. कार्ल फिलिप इमॅन्युएल बाखनं सोनाटा म्युझिकल फॉर्मची सुरुवात केली असली तरी खऱ्या अर्थानं या फॉर्मला लोकप्रियता मिळवून दिली ती हेडन आणि मोत्झार्ट या संगीतकारांनी.

श्रोत्यांचं लक्ष संगीतावरून विचलित होऊ नये यासाठी संगीतकार मंडळी आपल्या रचनेत ‘म्युझिकल फॉर्म’चा कसा वापर करतात ते आपण मागेच पाहिलं. रचनेत विविधता आणि एकता यांचा समतोल साधला जाण्यासाठी म्युझिकल फॉर्मचा उपयोग होतो. आपण पूर्वी पाहिलेले बायनरी, टर्नरी आणि रॉन्डो हे फॉर्म बरॉक कालखंडात वापरले जायचे.

बायनरी, टर्नरी आणि रॉन्डो फॉर्म वापरताना संगीतात एकता आणि विविधता या दोन्ही गोष्टी आणता येत होत्या. पण या फॉर्ममध्ये संगीतातली एखादी थीम घेऊन त्यात कल्पकतेनं बदल करत जाणं (थीम डेव्हलपमेंट) आणि त्यातून नवीन संगीत निर्माण करणं याला मर्यादा येत होत्या. बायनरी, टर्नरी आणि रॉन्डो फॉर्म छोटय़ा संगीतरचना करताना उपयोगी ठरत होत्या. पण लांब रचनांसाठी एखाद्या वेगळ्या फॉर्मची गरज होती. क्लासिकल कालखंडात ‘सोनाटा’ हा नवीन म्युझिकल फॉर्म उदयास आला. या फॉर्ममध्ये ‘थीम डेव्हलपमेंट’साठी खास वाव होता. या फॉर्मचा वापर करत संगीतकारांना लांबलचक रचना करणं शक्य व्हायला लागलं. संगीतकारांना हा फॉर्म प्रचंडच आवडायला लागला. या फॉर्ममध्ये संगीतकारांना आपल्या संगीतातल्या कल्पना मांडायला अधिकाधिक स्वातंत्र्य मिळायला लागलं.

‘सोनाटा’ या शब्दाचा मूळ अर्थ एखादी वाजवण्याची रचना असा होतो. हाच शब्द नंतर म्युझिकल फॉर्मसाठी वापरण्यात येऊ लागला. बरॉक कालखंडातला महान संगीतकार योहान सेबॅस्टियन बाख याचा मुलगा कार्ल फिलिप इमॅन्युएल बाख याच्या संगीतरचनांमध्ये सोनाटा फॉर्मचा सर्वप्रथम वापर केलेला दिसतो. वडील बरॉक कालखंडातले असले तरी कार्लची कारकीर्द क्लासिकल कालखंडातली येते. त्यानं कीबोर्डसाठी अनेक सोनाटाज (म्हणजे वाजवण्याच्या रचना) रचले. या रचनांमध्ये त्यानं सोनाटा हा म्युझिकल फॉर्म वापरला होता. कार्ल फिलिप इमॅन्युएल बाखनं सोनाटा म्युझिकल फॉर्मची सुरुवात केली असली तरी ख्रया अर्थानं या फॉर्मला लोकप्रियता मिळवून दिली ती हेडन आणि मोत्झार्ट या संगीतकारांनी.

सोनाटा फॉर्म वापरून केलेल्या रचनेचे तीन ठळक भाग असतात. यातला पहिला भाग ‘एक्स्पोझिशन’ नावानं ओळखला जातो. या भागात सुरुवातीला पहिली थीम येते. ही थीम बहुतेक वेळा लक्षात राहायला सोपी, ठळक रिदम असणारी, जोरदार अशी असते. या थीमनंतर ‘ब्रिज’ सुरु होतो. ब्रिज पहिल्या थीमला आणि दुस्रया थीमला जोडण्याचं काम करतो. पहिल्या पट्टीतून दुस्रया पट्टीत संगीत सफाईदारपणे नेण्याचं काम ब्रिज करतो. ब्रिजनंतर दुसरी थीम सुरु होते. ही थीम बहुतेकवेळा हळुवार, भावमय असते. या ठिकाणी ‘एक्स्पोझिशन’मधलं संगीत संपतं.

यानंतर सोनाटा म्युझिकल फॉर्ममधला डेव्हलपमेंट हा भाग सुरु होतो. या भागात संगीतकार ‘एक्स्पोझिशन’ मधल्या थीम्समध्ये (किंवा थीम्समधल्या तुकड्यांमध्ये) कल्पकतेनं नाविन्यपूर्ण बदल करतो. बहुतेकवेळा या भागात संगीत अनेक पट्टय़ांमध्ये फिरतं. बर्याचदा एक्स्पोझिशनमधल्याच थीम्स हार्मनी, रिदम यांमध्ये बदल झालेल्या रूपात ऐकायला मिळतात. डेव्हलपमेंट भागामुळे संगीतात विविधता येते. या भागाचं एक वैशिष्टय़ म्हणजे कुठल्याही क्षणी श्रोत्याला पुढचं संगीत कसं असेल (किंवा कोणत्या पट्टीत जाईल) याविषयी कसलीही कल्पना करता येत नाही. या फॉर्ममध्ये शेवटचा भाग ‘रिकॅपिटय़ुलेशन’ नावानं ओळखला जातो. या भागात ‘एक्स्पोझिशन’मधल्या दोन्ही थीम्स पुन्हा एकदा येतात. पण यावेळी मात्र दोन्ही थीम्स एकाच पट्टीत येतात. ही पट्टी ‘एक्स्पोझिशन’मधल्या पहिल्या थीमची पट्टी असते. पुन्हा एकदा त्याच थीम्स आल्यानं संगीतरचनेत एकता येते. अखेरीस बऱ्याचदा संगीतरचनेचा ठळक असा शेवट करण्यासाठी बऱ्याचदा ‘कोडा’ हा छोटासा भाग येतो.

क्लासिकल कालखंडात उदयास आलेल्या या म्युझिकल फॉर्मची लोकप्रियता नंतरही टिकून राहिली. सिम्फनी, कंचेटो, वाद्यांसाठी रचले गेलेले सोनाटाज आणि स्ट्रिंग क्वार्टेट्स यासारख्या संगीतरचनांमध्ये या म्युझिकल फॉर्मनं महत्वाची भूमिका बजावली. सोनाटा म्युझिकल फॉर्म कसा असतो हे पाहण्यासाठी आपण बिथोव्हनची Piano Sonata No. 21 1st Movement ही संगीतरचना ऐकूया.

[email protected]