राजकीय पक्षांकडून बक्षिसांची उधळण; साडेआठ हजार हंड्या रायगडात फुटणार

डीजेच्या तालावर ताल धरत, राजकीय पुढाऱ्यांनी पुरस्कृत केलेले लाल, निळे, पिवळे टी-शर्ट घालून थरावर थर रचून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली असून हा थरार पाहण्यासाठी रायगडकरांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गोकुळाष्टमीनिमित्त मंगळवारी (27) जिल्ह्यात 8 हजार 509 दहीहंड्या फोडण्यात येणार आहेत. यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या लाखो रुपये बक्षिसाच्या काही दहीहंड्या लक्षवेधी ठरणार आहेत. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी दहीहंडी हा उत्सव ‘सण’ म्हणूनच साजरा करण्याची पद्धत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा सणच राजकीय पक्षांनी हायजॅक केला असून त्याचा फायदा घेण्यासाठी राजकीय मंडळींमध्येच जोरदार स्पर्धा सुरू झालेल्या दिसून येतात. परिणामी दहीहंडी उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करण्याची शक्कल राजकीय पदाधिकाऱ्यांनी लढवली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे लावण्यात आली आहेत.

दहीहंडीसोबत मिरवणुकींचा जल्लोष

रायगड जिल्ह्यात 8 हजार 509 दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. यामध्ये 6 हजार 641 खासगी तर 1 हजार 868 सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश आहे. उत्सवानिमित्त काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारपासून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. एकूण 177 ठिकाणी मिरवणुका पारंपरिक पद्धतीने काढल्या जाणार असून या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत.

कडेकोट बंदोबस्त

दहीहंडी उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त दंगल नियंत्रण पथके, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे.

रोह्यात शिवसेनेच्या दहीहंडीत सवादोन लाखांचे लोणी

रोहा – रोह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत या मानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून सवादोन लाखांहून अधिक रुपयांची बक्षिसे यावेळी गोविंदा पथकांना देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक समीर शेडगे यांनी दिली.

यावर्षी प्रथमच महिला भगिनींसाठी गोविंदा पथकांना तीन थर लावल्यास प्रत्येकी रुपये 3333/- रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. बक्षिसाची रक्कम रोहा-अष्टमी शहरातील सर्व गोविंदा पथकांना विभागून देण्यात येणार आहे. प्रत्येक गोविंदा पथकास मानाची गदा आणि रोख बक्षिसाची रक्कम मिळणार असल्याने गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी उपतालुकाप्रमुख महादेवबुवा साळवी, शहरप्रमुख दीपक तेंडूलकर, तालुका संघटक नीता हजारे, शहर संघटक समिक्षा बामणे व सर्व शिवसैनिक मेहनत घेत आहेत.