दहीहंडीनिमित्त शहरातील वाहतुकीत उद्या बदल

शहरात दहीहंडीनिमित्त होणारी गर्दी विचारात घेता मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. मंगळवारी (दि.27) सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. सायंकाळी पाचपासून ते दहीहंडी फुटेपर्यंत या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

दहीहंडीनिमित्त छत्रपती शिवाजी रस्ता, महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेणू चौक, अप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावरील साहित्य परिषद चौक, नवी पेठेत मोठी गर्दी होते. छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौकमार्गे महापालिका भवनकडे जावे. बुधवार चौकातून अप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात येणार आहे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

वीर गोगादेव उत्सवानिमित्त आज लष्कर भागात वाहतूक बदल

पुणे – वीर गोगादेव उत्सवानिमित्त आज (दि. 26) लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. न्यू मोदीखाना परिसरातून मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ सोमवारी दुपारी होणार असून, लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. न्यू मोदीखाना भागातून सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. न्यू मोदीखाना, पूलगेट पोलीस चौकी, मेढीमाता मंदिर, महात्मा गांधी रस्ता, कुरेशी मशीद, सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, महावीर चौक मार्गे मिरवणूक महात्मा गांधी रस्त्याने जाणार आहे. मिरवणुकीची सांगता मेढी माता मंदिर येथे होणार आहे.