Nagar News – वाढीव नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा 6 वर्षांपासून संघर्ष, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरून राष्ट्रीय महामार्ग गेला असून त्या जमिनींचा योग्य परतावा न मिळाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या जमीनीला योग्य भाव न मिळावा या हेतूने शेतकऱ्यांची प्रशासनाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी दरम्यान सुरत ते चेन्नई राष्ट्रीय महामार्ग 222 गेला आहे. शेतकऱ्यांनी यासंबंधी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. यावेळी बाधित गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जमिनीचे वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल करून 6 वर्षे झाली असून, अद्याप शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही.

सर्व बाधित गावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधी निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सर्व शेतकरी गेली 5 ते 6 वर्षांपासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी लढत आहेत, मग हे मंडळी काय करत होती? असा प्रश्‍न उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.