
>> बद्रीनाथ खंडागळे
तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे आज दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी उघडण्यास सुरुवात झाली. 12 वाजून 55 मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण होऊन सध्या गोदावरी नदीत 3 हजार 144 क्युसेक वेगाने जलविसर्ग केला जात आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार सारंग चव्हाण यांनी पैठण शहरासह नदिकाठावरील महापूरप्रवण रेषेअंतर्गत असलेल्या गावांनी सतर्कता बाळगावी, असा सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रकल्पाच्या 27 पैकी 9, 15, 17, 18, 20 व 27 क्रमांकाचे 6 दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट वर करून हे पाणी सोडले जात आहे. पैठण शहरासह तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पैठण शहर, पाटेगाव, कावसान, नायगाव, मायगाव, वडवाळी, वाघाडी, नवगाव, आगरनांदुर, आवडेउंचेगाव, चनकवाडी, टाकळीअंबड, हिरडपुरी व आपेगाव या पुरप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या 16 गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.
View this post on Instagram
पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काठावरील शेतात बांधलेले पशुधन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे, असे आवाहन तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले आहे.