परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे, पनवेल आणि मडगाव दरम्यान दोन विशेष गाड्या धावणार

प्रातिनिधीक - फोटो

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण आणि मध्य रेल्वेने  पनवेल आणि मडगावदरम्यान 2 अतिरिक्त गणपती उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामुळे कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सव झाल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने गणपती उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मडगाव-पनवेल- मडगाव विशेष दरम्यान 2 सेवा चालविण्यात येणार आहेत. 01428 विशेष गाडी 15 सप्टेंबर रोजी मडगाव येथून 9.30 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री 10.15 वाजता पोहोचेल.

तर 01427 विशेष गाडी 15 सप्टेंबर रोजी पनवेल येथून रात्री 11.45 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचेल.

या गाड्या पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहेत.

तर एक द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 2 तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, आठ शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी (1 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह) आणि एक जनरेटर कार डबे या गाड्यांना असणार आहेत.

तर सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालतील आणि अतिजलद मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित सामान्य शुल्कासह यूटीएसद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात.