
अंधेरीच्या राजाचे भक्तीमय वातावरणात रविवारी सकाळी वर्सोवा चौपाटीवर विसर्जन झाले. मात्र विसर्जनादरम्यान बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झाली नाही. कोळी बांधवांनी छोट्या बोटीच्या सहाय्याने सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
अंधेरीचा राजा रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वर्सोवा चौपाटीवर विसर्जनासाठी पोहचला. यादरम्यान गणपती विसर्जनासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक पाण्यात उलटली. यावेळी बोटीतील सर्व भाविक समुद्रात पडले.
काही जण पोहत किनाऱ्यावर आले. तर इतरांना कोळी बांधवांनी छोट्या बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. समुद्रात पडल्यानंतर काही लोकांच्या पोटात पाणी गेले होते. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले.
सर्व सार्वजनिक गणपतींचे अनंत चतुर्दशीदिनी विसर्जन केले जाते. मात्र अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टी चतुर्दशीला विसर्जन करण्यात येते.