आम्ही गॅरंटी पूर्ण करणारच, मात्र भाजपने काय दिले? मल्लिकार्जून खरगे यांचा सवाल

काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी 12 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व 11 वर्ष पंतप्रधानपदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले याचा हिशोब द्यावा, असे आव्हान दिले.

नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, कर्नाटकात गृहज्योती योजनेअंतर्गत 200 युनिट वीज मोफत दिली जात असून त्यासाठी 9657 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातील आतापर्यंत 5164 कोटी रुपये खर्च केले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासासाठी 5015 कोटी रुपयांची तरतूद केली असून 2109 कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. गृहलक्ष्मी योजनेसाठी महिलांना प्रति महिना 2000 रुपये दिले जात असून 28 हजार 608 कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतुद केलेली आहे. या योजनेवर आतापर्यंत 13 हजार 451 कोटी खर्च झाले आहेत. अन्नभाग्य योजनेसाठी बीपीएल कुटुंबासटी 8080 कोटींची तरतूद केली असून यातून 2582 कोटी खर्च केले आहेत. बेरोजगार तरुणांसाठी युवानिधी योजनेअर्तंगत 650 कोटी तरतूद आहे, त्यातून 108 कोटी खर्च केले आहेत. पंतप्रधान मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे काही यंत्रणा नाही का, काहीही न पाहता, कोणतीही माहिती न घेता ते सर्रास खोटे बोलत आहेत.

भाजपाचे नेते भडकाऊ भाषण देत मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे. भाजपाने विकास कामे सांगून व थेट मत मागावे. योगी आदित्यनाथ यांच्या, बटेंगे तो कटेंगे, हा नारा आरएसएसला आवडतो. त्याच्याविरोधी नरेंद्र मोदींनी, एक है तो सेफ है चा नारा सुरु केला. मोदी व योगी बसून नेमका कोणता नारा द्यायचे ते ठरवावे. मारनेवाले, बांटनवाले तुम्हीच आणि दुसऱ्यांना बचेंगे तो कटेंगे सांगतात. देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. भाजपाच्या कोणी बलिदान दिले ते सांगा? मोदी हे खोटं बोल पण रेटून बोल या नितीचा अवलंब करतात असेही खर्गे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात भाजपाने त्यांचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते सर्वांना कामाला लागले आहे. पण जनता आता त्यांना साथ देणार नाही. महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी मविआचे सरकार आणा असे आवाहनही खर्गे यांनी केले. आज नागपुरात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी दीक्षाभूमिवर जाऊन अभिवादन केले.