धोकेबाज, विश्वासघातकी आणि गद्दारांना सत्तेतून हद्दपार करा; परळीत शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

बीड जिल्ह्यात विशेषत: परळीमध्ये गुंडांचे राज्य निर्माण झाले आहे. गुंडगिरीने सामान्य जनता दहशतीखाली वावरत आहे. व्यापारी शहर आणि जिल्हा सोडून जात आहेत. ज्या व्यक्तीला संकटकाळत आम्ही साथ दिली. त्या व्यक्तीने आमचा पक्षच फोडला, अशा व्यक्तीला सत्तेतून हद्दपार करा आणि परळीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी बीड जिल्ह्यात शरद पवार यांनी परळीत सभा घेतली. या सभेला व्यासपीठावर खा.बजरंग सोनवणे उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, अडचणीच्या काळात ज्यांना साथ दिली. मदतीचा आधार दिला. संकटकाळात धिर दिला. त्यांनी माझा पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला ,असे म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले, काही वर्षापूर्वी स्व.पंडित अण्णा मुंडे हे आपल्या मुलाला धनंजयला घेऊन माझ्याकडे आले. आम्हाला तुमची मदत हवी आहे असे म्हणत आमच्याकडून मदतीची अपेक्षा केली. संकटकाळात त्यांना मदत करण्याचा मी शब्द दिला. तो शब्द पूर्ण करत धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर मोठी संधी दिली. एवढेच काय विरोधी पक्षनेतेपदही दिले. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळातही त्यांना संधी दिली. मात्र काही वर्षातच त्यांनी आमचा पक्ष फोडला. मोठा धोका दिला, अशा गद्दारांना सत्तेतून हद्दपार करा. बीड जिल्ह्यात आणि विशेषत: परळीत गुंडगिरी वाढली आहे. व्यापारी दहशतीखाली निघून जात आहेत. ही गुंडगिरी संपविण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. या गुंडगिरीला पोसणार्‍या लोकांना पराभूत करायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले.