
गद्दारांनी आपला पक्ष फोडला. शरद पवार यांचा पक्ष फोडला. पवार साहेबांचे तर कुटुंब फोडले. मला वाटले त्यांना आम्हाला राजकारणातून संपवायचे होते. त्यासाठी पक्ष, निशाणी आणि नावही चोरले. कदाचित उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील.
जो अन्याय आपण गेल्या दोन वर्षांपासून सहन करतोय त्याविरोधात तुम्ही लढायला तयार आहात की नाही? महिलांवर अन्याय, अत्याचार होतायेत त्याविरोधात तुम्ही मतदान करणार आहात का? गेल्या दोन वर्षांत राज्याबाहेर नेलेल्या प्रकल्पाविरोधात तुम्ही मतदान करणार आहात की नाही? आज महाराष्ट्रात तरुण, शेतकरी, महिलांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात की नाही? अशी विचारणा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी करताच उपस्थित प्रचंड जनसमुदायाने उभे राहून, हात उंचावून आदित्य ठाकरे यांना साद दिली. महाराष्ट्रावरील हा अन्याय, अंधार दूर करण्यासाठी मशाल पेटवा, असे जबरदस्त आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना केले.
आमची सत्ता आल्यानंतर प्रकल्प पुन्हा आणू
गद्दारांना 50 खोके मिळाले, पण नागरिकांना धोके मिळाले, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, सध्याच्या या महायुती सरकारमुळे अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. तरुणांना रोजगार मिळू शकला नाही. आता त्यांच्याविरोधात लाट असताना निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’सारखी योजना आणून हे देऊ ते देऊ म्हणत आहे. मात्र, तुम्ही गेल्या दोन वर्षांत काहीच का दिले नाही, असा खडा सवाल केला. आमची सत्ता आल्यानंतर प्रकल्प परत आणू अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. याशिवाय बेरोजगार तरुणांना महिना चार हजार रुपये, लाडकी बहीण योजनेचे तीन हजार, तरुणाच्या हाताला काम देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अलंकापुरीतील फ्रूटवाले धर्मशाळा येथे आयोजित सभेत आदित्य ठाकरे यांची प्रचंड सभा झाली. याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन आहिर, जगन्नाथ शेवाळे, अशोक खांडेभराड, अतुल देशमुख उपस्थित होते.
– महाराष्ट्र, देश आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आदर आहेच. आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, पण मोदी साहेब, शहा साहेब आम्हाला सांगा गेल्या दोन वर्षांमध्ये तुम्ही आमचा महाराष्ट्र का लुटलात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
– तळेगावला होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेला. पावणे दोन लाख कोटींचा हा प्रकल्प होता. यातून राज्यातील एक लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळाला असता, हे सांगताच उपस्थितांनी ‘गद्दार, 50 खोके…’ म्हणून सत्ताधाऱयांच्या नावाने घोषणाबाजी केली. उपस्थितांतून ‘चोर मचाये शोर’, हा आवाज येताच ही लोकांची जनभावना असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
– भाजपच्या फसव्या घोषणांचा समाचार आदित्य ठाकरे यांनी घेतला. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार होतात त्याचे काय झाले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे अद्याप उभारू शकले नाहीत. कोकणात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याचे दुःख आहे, मात्र वाऱयामुळे पुतळा पडल्याचे मुख्यमंत्री सांगतात. भाजप सरकारकडून देशात कामगार कायदे आणले जात आहेत, मात्र अन्यायकारक कायदे राज्यात लागू करू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बलात्काऱ्यांना पक्षात स्थान देणाऱयांना तुम्ही लाडका भाऊ समजू शकता का?
पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुन्यांना पक्षात घेतले त्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही लाडका भाऊ समजणार आहात का? ज्या मिंधे गटाचे नेते बदलापूर घटनेनंतर एका महिला पत्रकाराला अश्लील भाषेत बोलतात अशा एकनाथ शिंदेंच्या पक्षाला तुम्ही आपला पक्ष समजू शकता का? ज्या भाजपने बिल्कीस बानोच्या बलात्काऱयांना स्वतःच्या पक्षात घेतले, आशा बलात्काऱयांच्या पक्षांना तुम्ही आपला पक्ष समजणार आहात का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
ज्यांच्या विरोधात लढाई त्यांनाच आता डोक्यावर घेतले
आज ज्या गद्दाराला तुम्ही डोक्यावर बसविले, ज्या अजित पवार यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केले त्यांच्या विरोधात या जिह्यात जे भाजपचे कार्यकर्ते दहा वर्षे लढा देत होते, आंदोलने करत होते, अनेकांनी अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, मात्र त्यांना आता तुम्ही डोक्यावर बसविले आहे. त्यामुळे तुमचे जे अस्सल भाजपवाले आहेत, ज्यांनी भाजप वाढविला ते आता कुठे आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी भाजपला विचारला.
आदित्य ठाकरे यांची उद्या कुर्ला येथे सभा
कलिना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पोतनीस यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बुधवार, 13 नोव्हेंबरला कुर्ला पश्चिम येथे संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा घेणार आहेत. न्यू मिल रोड येथील तानाजी चौकातील शत्रुंजय गिरीराज कॉम्प्लेक्स येथे ही सभा होणार आहे.