मोरा-भाऊचा धक्का लाँच सेवा गाळात रुतली; सागरी प्रवासी वाहतूक कोलमडली

सागरी पर्यटन व प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली मोरा-भाऊचा धक्का लाँच सेवा गाळात रुतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या बंदरातील गाळच काढला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2022 मध्ये चार कोटी खर्च करून गाळ काढण्यात आला. मात्र हा गाळ थुकपट्टी लावून काढण्यात आल्याने ही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. बंदरातील साचलेल्या गाळामुळे ओहोटीच्या वेळी खबरदारी म्हणून लाँच सेवेच्या फेऱ्या दुपारनंतर कमी करण्यात आल्या आहेत. सागरी प्रवासी वाहतूक कोलमडल्याने कामानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना याचा फटका बसत आहे.

बंदरात सातत्याने गाळ साचत असल्याने समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटी मोरा बंदरात रुतून बसतात. त्यामुळे समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटी ठराविक कालावधीसाठी बंद ठेवण्यात येतात. गाळामुळे सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण-भाऊचा धक्का प्रवासी लाँच सेवा सुरळीत करणाऱ्यांसाठी महाराष्ट्र बंदर विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्यात येतो. मात्र त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरण्याचे काम थांबलेले नाही. मोरा बंदरात साचलेल्या गाळामुळे ओहोटीच्या वेळी खबरदारी म्हणून मोरा- भाऊचा धक्का लाँच सेवा ४ डिसेंबरपर्यंत दुपारनंतर बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे.