इलेक्ट्रिक रॉडने पाणी गरम करताना वीजेचा शॉक, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अंघोळीसाठी इलेक्ट्रिक रॉडने पाणी गरम करताना वीजेचा शॉक लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ही घटना घडली. सपना असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पाणी गरम झाल्यानंतर सपना स्विच बंद करण्यास विसल्याने ही घटना घडली.

घटनेवेळी सपनाचा पती कामावर गेला होता, तर मुलगी शाळेत गेली होती. सपना घरी एकटीच होती. सपनाने इलेक्ट्रिक रॉडने अंघोळीचे पाणी गरम करण्यास ठेवले होते. पाणी गरम झाल्यानंतर सपना स्विच बंद करण्यास विसरली आणि रॉडला हात लावला. यामुळे सपनाला वीजेचा शॉक लागला.

मुलगी शाळेतून आल्यानंतर दरवाजा ठोठावत होती. मात्र बराच वेळ आई दरवाजा उघडत नसल्याने मुलीने शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. शेजाऱ्यांनी सपनाच्या पतीला याबाबत माहिती दिली. यानंतर पतीने घर गाठत मागचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सपना जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडली होती आणि इलेक्ट्रिक रॉड लावलेला स्विच चालू होता.

सपनाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.