आसाममधील मंदिराचे नूतनीकरण रोखले, बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मुजोरी

बांगलादेशात हिंदूंवर तसेच मंदिरांवर हल्ले सुरू असतानाच आता बांगलादेशची मजल आसाममधील मंदिराचे नूतनीकरण रोखण्यापर्यंत गेली आहे. आता आसाममधील श्रीभूमी जिह्यातील एका मंदिराचे नूतनीकरण बांगलादेशच्या बॉर्डर गार्ड जवानांनी हस्तक्षेप करून थांबवल्याचे समोर आले आहे. हे काम कायमचे थांबवण्यात आल्याचेही जवानांनी जाहीर केले आहे. दरम्यान, याप्रकरणी संभ्रम निर्माण झाला होता, परंतु चर्चेअंती हे प्रकरण निकाली निघाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे श्रीभूमी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सीमेजवळ मनसा मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या मंदिराजवळ काळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे कव्हर होते. तसेच येथे कामगारांनी एक छोटा तंबूही उभारला होता. ते पाहून बॉर्डर गार्ड बांगलादेशचे जवान त्या ठिकाणी आले आणि त्यांनी काम काही काळ रोखले. त्यानंतर एक बैठक झाली. या बैठकीत सर्व गैरसमज दूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी बॉर्डर गार्ड बांगलादेशचे जवान नदी पार करून हिंदुस्थानी क्षेत्रात आले. याच ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू होते. हे नूतनीकरणाचे काम तत्काळ थांबवण्याची सूचना करत त्यांनी हिंदुस्थानच्या सीमा सुरक्षा दलाला पत्र दिले.

आठवडाभरापूर्वी सीमेवर झाले होते आंदोलन

बांगलादेशात हिंदूंवर आणि मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोन्ही देशांच्या सीमेवर हिंदू नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी जोरदार आंदोलन करण्यात आले. नागरिक इतके संतप्त होते की, त्यांनी पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्लाही केला. त्यामुळे त्यांनी लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले होते.

स्थिती संशयास्पद दिसल्याने बांधकाम रोखले

सीमेवर स्थिती संशयास्पद दिसल्याने बॉर्डर गार्ड बांगलादेशचे जवान सीमा पार करून हिंदुस्थानात आले. दोन्ही देश एकमेकांच्या सीमांवर नजर ठेवून आहेत. सीमेवर काही संशयास्पद हालचाल दिसली तर दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांशी बोलतात आणि चौकशीअंती सर्व काही सुरळीत होते असे हिंदुस्थानच्या सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.