
विधानसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी महायुतीकडून राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज विधिमंडळ सचिवालयाकडे दाखल करण्यात आला. विरोधी पक्ष महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उद्या त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होईल.
चौदाव्या विधानसभेत अध्यक्ष म्हणून अडीच वर्षे काम केल्यानंतर नव्या सरकारमध्ये नार्वेकर मंत्रीपदासाठी इच्छुक होते असे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी अनेकांच्या नावाची चर्चा सुरू होती. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांचा अनुभव लक्षात घेऊन अध्यक्षपदासाठी या दोघांना विचारणा करण्यात आली होती. मात्र, दोन्ही नेत्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते. त्यानंतर भाजपने नार्वेकर यांचे नाव निश्चित केले.